अमेरिकेची अफगाणिस्तानातून सैन्यमाघार सुरू

- सुरक्षेसाठी युद्धनौका आयसेनहॉवर व बॉम्बर्स सज्ज ठेवले

काबुल/वॉशिंग्टन – अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीच्या घोषणेला दहा दिवसही उलटत नाही तोच अमेरिकेने माघारीची प्रक्रिया सुरू केली. अफगाणिस्तानातील अमेरिकी लष्कराच्या प्रमुखांनी याची माहिती उघड केली आहे. अमेरिकी जवानांबरोबर लष्करी साहित्यही अफगाणिस्तानातून बाहेर काढले जात आहे. ही प्रक्रिया सुरू असताना अमेरिकी जवानांवर हल्ले झाल्यास प्रत्युत्तरासाठी अमेरिकेने ‘युएसएस आयसेनहॉवर’ ही अजस्त्र विमानवाहू युद्धनौका व बॉम्बर्स सज्ज ठेवले आहेत. दरम्यान, ‘सीआयए’चे प्रमुख विल्यम बर्न्स यांच्या अफगाणिस्तान दौर्‍यानंतर ही माघार सुरू झाली आहे.

गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अफगाणिस्तानातून पूर्ण माघारीची घोषणा केली होती. १ मे पासून माघार सुरू करून ११ सप्टेंबरपर्यंत अमेरिकेचे सर्व जवान मायदेशी परततील, असे बायडेन यांनी जाहीर केले होते. पण १ मे आधीच अमेरिका व नाटोच्या लष्कराने अफगाणिस्तानातून माघारीची प्रक्रिया सुरू केली आहे. अफगाणिस्तानकडे येथील लष्करी तळांची जबाबदारी सोपविण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती अफगाणिस्तानातील अमेरिकेचे सैन्यप्रमुख जनरल स्कॉट मिलर यांनी दिली.

यानुसार, अमेरिका अफगाणिस्तानच्या लष्कराला कंदहार हवाईतळ, हेल्मंड प्रांतातील कॅम्प शोराबाक, राजधानी काबुलमधील कॅम्प इगर्स तसेच मैदान वरदाक प्रांतातील सीओपी हे तीन तळ सुपूर्द केले जातील. ‘अफगाणिस्तानातील शांतीचर्चा सुरू असतानाच अमेरिकी लष्कराची ही माघार सुरू झाली आहे. पण आम्हाला तसेच आदेश आहेत. यापुढे शांतीचर्चेचे भवितव्य अफगाणी सरकार आणि तालिबानच्या हाती आहे. तालिबानने अफगाणिस्तानातील हिंसाचार थांबवावा’, असे आवाहन जनरल मिलर यांनी केले.

अफगाणिस्तानकडे लष्करी तळ सुपूर्द करण्याची प्रक्रिया सुरू असेपर्यंत अमेरिकेने येथील आपली संरक्षण साहित्य अफगाणिस्तानबाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. ही सैन्यमाघार सुरक्षितरित्या पार पडावी, यासाठी अमेरिकेने ‘युएसएस ड्विट आयसेनहॉवर’ ही विमानवाहू युद्धनौका आणि दोन ‘बी-५२’ बॉम्बर्स विमाने आखातात सज्ज ठेवली आहेत. या माघारीच्या प्रक्रियेदरम्यान अमेरिकी जवानांवर हल्ला झाला तर पुढील कारवाईसाठी ही सज्जता ठेवण्यात येत असल्याचे पेंटॅगॉनचे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेच्या या सैन्यमाघारीवर तालिबानने टीका केली होती. अमेरिकेने केलेल्या दोहा करारानुसार, १ मेपर्यंत अमेरिकेला अफगाणिस्तानातून पूर्ण माघार घेणे आवश्यक होते. पण बायडेन प्रशासनाने ही सैन्यमाघार ११ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे संतापलेल्या तालिबानने १ मेनंतर अफगाणिस्तानात अमेरिकी किंवा नाटोचे जवान दिसले तर त्यांच्यावर हल्ले चढविण्याची धमकी दिली होती. तालिबानने आपली धमकी प्रत्यक्षात उतरविली, तर त्यातून नवा घनघोर संघर्ष सुरू होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अमेरिकेची अफगाणिस्तानातील सैन्यमाघार धोक्यात येऊ शकते. त्यामुळे अमेरिकेच्या माघारीची ही प्रक्रिया पूर्ण झाल्याखेरीज त्यावर अंतिम प्रतिक्रिया नोंदविता येणार नाही, अशी सावध भूमिका काही विश्‍लेषकांनी घेतली आहे.

leave a reply