अमेरिका इराणवरील निर्बंध अधिक व्यापक करणार

वॉशिंग्टन/तेहरान – इराणचा आण्विक तसेच क्षेपणास्त्र कार्यक्रम आणि लष्कराशी संबंधित निर्बंधांची व्याप्ती वाढविणार असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी जाहीर केले. इराणने होर्मुझच्या आखातातील युद्धसरावात अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकेची प्रतिकृती नष्ट केल्यानंतर अमेरिकेने ही निर्बंधांची घोषणा केली. दरम्यान, अमेरिकेच्या निर्बंधांना घाबरुन इराण आपला अणुकार्यक्रम थांबविणार नसल्याचे इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांनी स्पष्ट केले आहे.

America-Iranदोन दिवसांपूर्वी होर्मुझच्या आखातात इराणने आयोजित केलेला लाईव्ह फायरिंगचा युद्धसराव संपन्न झाला. या युद्धसरावात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‍सने अमेरिकेच्या निमित्झ युद्धनौकेची प्रतिकृती उद्ध्वस्त केली. त्याचबरोबर अमेरिकेने आखातातील आपल्या हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी तैनात केलेली थाड यंत्रणा नष्ट करण्याचा सरावही केला. इराणचा हा युद्धसराव अमेरिका तसेच या क्षेत्रातील अमेरिकेच्या मित्रदेशांसाठी इशारा असल्याचे बोलले जाते. इराणचा हा युद्धसराव संपल्यानंतर पुढच्या काही तासातच अमेरिकेने इराणवरील नव्या निर्बंधांचे संकेत दिले.

इराणच्या आण्विक-क्षेपणास्त्र कार्यक्रमाशी तसेच लष्कराशी संबंधित २२ घटकांवर अमेरिका निर्बंध लादणार असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‍सशी संबंधित कंपन्या किंवा व्यक्तींवरही कारवाई होणार असल्याचे पॉम्पिओ यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर संयुक्त रा़ष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने इराणवरील निर्बंधांची मुदत वाढवावी, असे आवाहन अमेरिकेने केले आहे. अमेरिकेने दिलेल्या या निर्बंधांच्या इशार्‍यावर इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांनी ताशेरे ओढले असून इराण आपल्या अणुकार्यक्रमातून माघार घेणार नसल्याचे खामेनी यांनी म्हटले आहे.

America-Iranनिर्बंधांद्वारे अमेरिका इराणवर आर्थिक दडपण वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप खामेनी यांनी केला. या आर्थिक दडपणाबरोबरच इराणमधील राजवटीविरोधात जनतेची निदर्शने भडकविण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असल्याचा दावा इराणच्या सर्वोच्च नेत्यांनी केला. याआधीही इराणच्या नेत्यांनी आपल्या देशातील निदर्शनांसाठी अमेरिका जबाबदार असल्याचा ठपका ठेवला होता. त्याचबरोबर अमेरिकेच्या निर्बंधांमुळे इराणच्या अर्थव्यवस्थेवरील दडपण वाढत असल्याची टीका केली होती. गेल्या वर्षभरात अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांनी इराणच्या अर्थव्यवस्थेला ५० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याची माहिती इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी दिली होती.

दरम्यान, होर्मुझच्या आखातातील इराणचा युद्धसराव संपल्यानंतर इराणच्या तबरीझ येथील रिव्होल्युशनरी गार्ड्‍सच्या लष्करी तळावर स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिकांच्या हवाल्याने इस्रायली वर्तमानपत्राने ही माहिती प्रसिद्ध केली. पण इराणची सरकारी माध्यमे हा स्फोट नसून फटाक्यांचा आवाज असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे इराणमधील संशयास्पद स्फोटांच्या मालिकेचे गुढ वाढतच चालले आहे.

leave a reply