महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ

- आठ राज्यांना केंद्र सरकारचा सावधानतेचा इशारा

मुंबई – महाराष्ट्रात दरदिवशी आढळत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गुरुवारी महाराष्ट्रात पाच हजार 368 नवे कोरोना रुग्ण आढळले, तर 22 जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात चोवीस तासात आढळलेल्या रुग्णांपैकी 70 टक्के रुग्ण हे एकट्या मुंबई विभागातील आहेत. मुंबईत कोरोनाच्या तीन हजार 671 नव्या रुग्णांची नेोंद झाली. एप्रिलनंतर प्रथमच राज्यात एका दिवसात इतके रुग्ण आढळले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील निर्बंध आणखी कडक होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह पश्‍चिम बंगाल, तमिळनाडू, दिल्ली, कर्नाटक, गुजरात, झारखंड आणि हरयाणामध्येही संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. या राज्यांमध्ये एक रुग्ण सरासरी किती जणांना संक्रमित करतो याचे प्रमाण आर व्ह्यॅल्यूमध्ये वाढ झाल्याचे लक्षात आले आहे. यानंतर केंद्र सरकारने या राज्यांना ॲलर्ट जारी केला आहे. तिसरी लाट रोखायची असेल, तर राज्यांना कडक पावले उचलावी लागतील, असे केंद्र सरकारने बजावले आहे.

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ - आठ राज्यांना केंद्र सरकारचा सावधानतेचा इशारादेशात बुधवारी निरनिराळ्या राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले होते. विशेषत: महाराष्ट्रात त्यामध्ये मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या वाढली होती. यामुळे देशात चोवीस तासात आढळलेल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या 13000 वर पोहोचली. 49 दिवसांनंतर देशात चोवीस तासात नोंदविली जात असलेली कोरोनाची रुग्णसंख्या 10 हजारांच्या पुढे गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती गुरुवारी सकाळी देण्यात आली. मात्र संध्याकाळी गुरुवारच्या दिवसातील विविध राज्यातून आलेली रुग्णसंख्या पाहता चिंता आणखीनच वाढल्या आहेत. महाराष्ट्रात पाच हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली. पश्‍चिम बंगालमध्ये दोन हजाराहून अधिक रुग्ण आढळले. तर दिल्लीतही 1300 हून अधिक रुग्णांची नोंंद झाली.

विविध राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झालेली वाढीने केंद्र सरकार व राज्य सरकारांना चिंतेत टाकले आहे. देशातील आठ जिल्ह्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह दर हा 10 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. तर 5 ते 10 टक्क्यांमध्ये पॉझिटिव्ह दर असलेल्या जिल्ह्यांची संख्या 14 झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी वाढणाऱ्या आर व्ह्यॅल्यूकडे लक्ष वेधले. देशातील आर व्हॅल्यू ही 1.22 वर पोहोचली आहे. ही आर व्हॅल्यू देशात कोरोनाचे संक्रमण वेगाने पसरत असल्याचे दर्शवत असल्याचे अग्रवल म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून येत आहे. काही राज्यांमध्ये सतत दिसून येत असलेली वाढ चिंतेचे कारण ठरू शकते, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच केंद्र सरकारकडून आठ राज्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. यामध्ये दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, हरयाणा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल कर्नाटक आणि झारखंड या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांनी लवकरात लवकर कठोर पावले उचालावी, अशा सूचना यामध्ये करण्यात आल्या आहेत. या राज्यांनी प्रतिबंधक पावले उचलली, तर तिसरी लाट घातक होण्यापासून रोखता येईल, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. ओमिक्रॉन आणि डेल्टा या दोन व्हेरिअंटच्या एकत्रित परिणामातून जगात कोरोनाची त्सुनामी येण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली असताना भारतात ओमिक्रॉन व्हेरिअंटसह कोरोनाच्या रुग्णांची वाढत संख्या धास्ती वाढविणारी ठरते.

दरम्याम, महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टास्क फोर्सबरोबर तातडीची बैठक पार पडली. लवकरच निर्बंध अधिक कडक केले जाण्याचे संकेत यातून मिळत आहेत. याआधी मुंबईत 7 जानेवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश काढण्यात आले आहेत.

leave a reply