दक्षिण कोरियानेही आण्विक पाणबुड्यांचे तंत्रज्ञान मिळवायला हवे

- राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार ली जाए-म्युंग

सेऊल/वॉशिंग्टन – उत्तर कोरियापासून असलेल्या धोक्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी दक्षिण कोरियानेही आण्विक पाणबुड्यांचे तंत्रज्ञान मिळवायला हवे, अशी आक्रमक भूमिका राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार ली जाए-म्युंग यांनी घेतली आहे. एका मुलाखतीत म्युंग यांनी यासंदर्भात वक्तव्य करताना ऑस्ट्रेलियाने अमेरिका व ब्रिटनबरोबर केलेल्या ‘ऑकस डील`चा उल्लेख केला. सप्टेंबर महिन्यात झालेल्या या करारावर दक्षिण कोरियाच्या विद्यमान सरकारने सावध भूमिका घेतली होती. त्यामुळे आघाडीचे उमेदवार असणाऱ्या म्युंग यांनी याबाबत घेतलेली भूमिका लक्ष वेधून घेणारी ठरते.

दक्षिण कोरियानेही आण्विक पाणबुड्यांचे तंत्रज्ञान मिळवायला हवे - राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार ली जाए-म्युंगदक्षिण कोरियात पुढील वर्षी मार्च महिन्यात राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष मून जाए-इन यांच्या डेमोक्रॅटिक पार्टीने म्युंग यांची उमेदवार म्हणून निवड केली आहे. कोरोना साथीविरोधातील आक्रमक उपाययोजना व आर्थिक धोरणांमुळे म्युंग लोकप्रिय ठरले असून काही सर्वेक्षणांमध्ये त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर आघाडी घेतल्याचेही समोर आले आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी आण्विक पाणबुड्यांबाबत केलेले वक्तव्य महत्त्वाचे ठरते.

ऑक्टोबर महिन्यात उत्तर कोरियाने पाणबुडीतून क्षेपणास्त्र चाचणी केली होती. त्यावर दक्षिण कोरियातून आक्रमक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. दक्षिण कोरियाने आण्विक पाणबुडी विकसित करावी, अशी मागणीही त्यावेळी लष्कर तसेच संसद सदस्यांकडून करण्यात आली होती. ली जाए-म्युंग यांनी त्याचा पुनरुच्चार करून आण्विक पाणबुडीसाठी अमेरिकेकडे पाठपुरावा करण्याचे संकेत दिले. राजनैतिक तसेच तांत्रिक पातळीवर अमेरिकेने सहकार्य करावे, यासाठी आपण प्रयत्न करु असे म्युंग यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले. यावेळी त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या ‘ऑकस डील`चा उल्लेख केला.

दक्षिण कोरियानेही आण्विक पाणबुड्यांचे तंत्रज्ञान मिळवायला हवे - राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार ली जाए-म्युंग‘दक्षिण कोरियाकडे आण्विक पाणबुडी असणे गरजेचे आहे. ऑस्ट्रेलियाला देण्यात येणाऱ्या पाणबुड्या शस्त्रसज्ज नाहीत, तर त्यांना त्याचे तंत्रज्ञान देण्यात येत आहे. दक्षिण कोरियानेही या तंत्रज्ञानासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे`, असे म्युंग म्हणाले. त्याचवेळी या पाणबुड्यांसाठी फ्रान्सचे सहकार्य घेण्याचा मुद्दा त्यांनी फेटाळून लावला. यावेळी म्युंग यांनी अमेरिका व चीनमधील संघर्षाचा मुद्दाही उपस्थित केला. दक्षिण कोरियाने या संघर्षाबाबत अस्पष्ट धोरण स्वीकारण्याची गरज नाही, उलट त्या देशांनी कोरियाबाबतचे धोरण स्पष्ट करण्याची गरज आहे, अशी आग्रही भूमिका म्युंग यांनी मांडली.

इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या वर्चस्ववादी कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी सप्टेंबर महिन्यात अमेरिका, ब्रिटन व ऑस्ट्रेलियादरम्यान व्यापक संरक्षण सहकार्य करार करण्यात आला होता. ‘ऑकस डील` असे नाव असलेल्या या करारानुसार, अमेरिका व ब्रिटन ऑस्ट्रेलियाला आठ आण्विक पाणबुड्या पुरविणार आहे. त्याव्यतिरिक्त दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे, सायबर तंत्रज्ञान, आर्टिफिशल इंटेलिजन्स, क्कांटम तंत्रज्ञान या क्षेत्रातील परस्पर सहकार्यावरही एकमत झाले आहे.

leave a reply