कुठल्याही परिस्थितीत देशाच्या आर्थिक विकासावर परिणाम होऊ देणार नाही

- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

आर्थिक विकासावरनवी दिल्ली – ‘देश कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने कोरोनाची साथ आलेली असताना दिलेल्या सवलती मागे घेतल्या, तरी त्याचा परिणाम भारत आपल्या आर्थिक विकासावर होऊ देणार नाही’, असा आत्मविश्‍वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला. पुढच्या आर्थिक वर्षातही मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या यादीत सर्वाधिक वेगाने आर्थिक विकास करणारा देश असेल, अशी ग्वाही अर्थमंत्री सीतारामन यांनी दिली.

‘फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज् अँड चेंबर्स ऑफ कॉमर्स-एफआयसीसीआय’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सीतारामन बोलत होत्या. कोरोनाचे संकट आलेले असताना, अमेरिकेने आपल्या उद्योगक्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या होत्या. पण आता अमेरिकेचे फेडरल रिझर्व्ह या सवलती मागे घेऊन काही कठोर आर्थिक निर्णय घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याचे परिणाम अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेबरोबरच इतर देशांच्या अर्थकारणावरही होऊ शकतात. मात्र भारत कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असून आपल्या आर्थिक प्रगतीवर भारत याचा परिणाम होऊ देणार नाही, असे सीतारामन यांनी म्हटले आहे.

याआधी आलेल्या आर्थिक मंदीच्या काळात भारतासमोर वेगाने आर्थिक प्रगती करण्याची सुवर्णसंधी आली होती. पण त्यावेळी ही संधी साधता आली नाही. आर्थिक मंदी आलेली असताना, अर्थव्यवस्थेतील रोखता वाढविण्यासाठी घेतलेले निर्णय योग्य वेळी मागे घेण्यात आले नव्हते. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला व आर्थिक मरगळ आली होती, याची आठवण सीतारामन यांनी करून दिली.

यानंतरच्या काळात जगातील अशक्त अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समवेश झाला होता. पण यातून धडा घेतलेला आजचा भारत पुन्हा अशी चूक करणार नाही. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या घडामोडींकडे भारत अतिशय सावधपणे पाहत आहे. तसेच आव्हानांवर मात करून योग्य निर्णय घेण्याची क्षमता देशाकडे आहे. त्यामुळे देश कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे, असा विश्‍वास सीतारामन यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, कोरोनाची साथ आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या घडामोडींमुळे निर्माण झालेल्या अनिश्‍चिततेचा परिणाम विकसित व श्रीमंत देशांच्या अर्थव्यवस्थांवरही होत आहे. मात्र भारत अशा आव्हानात्मक काळातही आश्‍वासक आर्थिक प्रगती करीत असल्याचे समोर येत आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवरील आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचा विश्‍वास अधिकच दृढ झाला आहे. पण पुढच्या काळात इंधनाच्या दरवाढीपासून आर्थिक पातळीवरील अनिश्‍चिता अधिकच वाढत जाईल. ख्यातनाम अर्थतज्ज्ञांनी याबाबत इशारे दिले आहेत. अशा काळातही भारताच्या आर्थिक प्रगतीवर परिणाम होऊ देणार नाही, ही अर्थमंत्र्यांनी दिलेली ग्वाही यामुळेच लक्षवेधी ठरते.

leave a reply