बैरुत स्फोटानंतर लेबेनॉनमधील सरकारचा राजीनामा

बैरुत – गेल्या आठवड्यात बैरुत बंदरात झालेल्या स्फोटानंतर जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागलेल्या आणि भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या लेबेनॉनमधील पंतप्रधान हसन दियाब यांच्या सरकारने सोमवारी राजीनामा दिला. लेबेनॉनमधील भ्रष्टाचाराने बैरुत स्फोट घडविल्याची टीका पंतप्रधान दियाब यांनी यावेळी केली. पंतप्रधान दियाब यांच्या राजीनाम्याबरोबर राष्ट्राध्यक्ष मिशेल एऑन यांच्या राजीनाम्याची मागणी जोर पकडू लागली आहे. दरम्यान, बैरुत स्फोटाची पारदर्शी चौकशी व्हावी, अशी मागणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.

बैरुत

४ ऑगस्ट रोजी बैरुतच्या बंदरात झालेल्या स्फोटात २०० हून अधिक जणांचा बळी गेला तर सहा हजाराहून अधिक जण जखमी झाले आहेत. बंदरातील गोदामात असुरक्षितरित्या साठवलेल्या अमोनियम नायट्रेटमुळे हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. येथील कस्टम अधिकार्‍यांनी राष्ट्राध्यक्ष एऑन यांच्यासह सरकारला या साठ्याबाबत सावध करुनही खबरदारी घेतली नाही, म्हणून लेबेनीज सरकारवर जोरदार टीका होत आहे. लेबेनीज जनतेचा हा राग शांत करण्यासाठी सरकारने बंदरातील कस्टम अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना अटक केली होती. तर राष्ट्राध्यक्ष एऑन यांनी या स्फोटामागे बाह्यशक्ति जबाबदार असल्याचा आरोप करुन क्षेपणास्त्र हल्ले झाल्याची शक्यता वर्तविली होती.

पण याआधीच देशाला आर्थिक संकटात ढकलणार्‍या, भ्रष्टाचाराचे आरोप होत असलेल्या दियाब सरकारविरोधातील रोष या बैरुत स्फोटाने अधिकच तीव्र झाला. यावेळी बैरुतच्या जनतेने रस्त्यावर उतरुन निदर्शने केली. त्याचबरोबर सरकारच्या मंत्रालयांचा ताबा घेत निदर्शकांनी ’मुळापासून शेंड्यापर्यंत’ सरकार बदलावे, अशी मागणी केली. यानंतर लेबेनॉनच्या सरकारमधील चार नेत्यांनी राजीनामे देऊन पंतप्रधान दियाब यांच्यावरील दबाव वाढविला. पंतप्रधान दियाब यांनी देखील सोमवारी संध्याकाळी आपल्या पदाचा राजीनामा देत लवकरच निवडणूक घेण्यात येईल, असे जाहीर केले. तसेच बैरुत स्फोटासाठी आपल्या देशात महामारीसारखी पसरलेला भ्रष्टाचार जबाबदार असल्याचा आरोप दियाब यांनी केला.

तर आपल्याकडे देशाच्या सुरक्षेपेक्षा भ्रष्टाचाराला सर्वाधिक महत्त्व दिले जात असल्याचा ठपकाही दियाब यांनी ठेवला. दियाब यांच्या या राजीनाम्याबरोबर लेबेनॉनमध्ये राष्ट्राध्यक्ष एऑन यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर पकडू लागली आहे. एऑन यांच्या पक्षसहकार्‍यांनीच त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. तर लेबेनीज राष्ट्राध्यक्ष व हिजबुल्लाहच्या बचावासाठी इराणने धाव घेतली आहे. बैरुत स्फोटाचे राजकारण करू नका, असे आवाहन इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरीफ यांनी केले आहे.

leave a reply