अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू

मुंबई – लॉकडाऊनमुळे २३ मार्च पासून बंद करण्यात आलेली मुंबईची लाइफलाईन अखेर सोमवारपासून सुरु करण्यात आली आहे. मात्र रेल्वेच्या तिन्हीमार्गावर सुरु करण्यात आलेली सेवा अत्यावश्यक सेवेतील कार्मचाऱ्यांकरिताच मर्यादित असून सामान्य नागरिकांसाठी ही सेवा उपलब्ध नसल्याचे रेल्वेतर्फे जाहीर करण्यात आले. अत्यावश्यक सेवेत सुमारे १.२० लाख कर्मचारी असून लोकल सेवा सुरु करण्यात आल्याने या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळला आहे.

Local-Trains-Mumbaiअत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कामावर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येत असल्याने त्यांच्यासाठी लोकल सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. राज्य सरकारकडून रेल्वे मंत्रालयाकडे त्यासाठी पाठपुरावा देखील करण्यात येत होता. अखेर लोकल सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाअंतर्गत पश्चिम रेल्वे मार्गवार १२० व मध्य रेल्वेवरील मार्गावर लोकल २०० फेऱ्या होतील. सकाळी साडे पाच ते रात्री साडे अकरा या कालावधीत या दोन्ही मार्गांवर लोकल धावतील. दर १५ मिनिटांच्या अंतराने लोकल सोडण्यात येणार असल्याचे रेल्वेने सांगितले.

केवळ महत्वाच्या स्थानकांवरच या लोकल थांबणार असल्याचे सांगण्यात आले. अत्यावश्यक सेवेत असलेल्या सरकारी व खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसह पालिकेच्या कर्मचाऱ्यांना लोकल प्रवास करता येणार आहे. सध्या वैध ओळखपत्राच्या आधारे कर्मचाऱ्यांना प्रवास करण्याची अनुमती देण्यात येणार असून त्यांना लवकरच क्यूआर कोड असलेले कार्ड देण्यात येईल. स्थानकात प्रवेश करण्यापूर्वी हे कार्ड स्कॅन करावे लागेल.

लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी ‘बेस्ट’ बस ने प्रवास करत होते. मात्र जूनपासून खाजगी कंपन्यांना १० टक्के कर्मचाऱ्यांसह अनुमती देण्यात आल्याने बेस्टच्या गर्दीत वाढ झाली आहे. तसेच खाजगी वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने वाहतूककोंडीत वाढल्याने लोकल सेवा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होती. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कामावर पोहोचण्यास होणारा विलंब लक्षात घेता अखेर लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र लोकलने सामान्य नागरिक प्रवास करणार नाहीत याकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांना पार पाडावी लागणार आहे.

leave a reply