दक्षिण कोरियाने कोरोनाच्या साथीनंतरचा स्मार्ट प्लॅन तयार केला

सेऊल – कोरोनाव्हायरसच्या संकटातून इतक्यात तरी जगाची सुटका होणार नाही. यावर जगभरातील तज्ज्ञ व विश्लेषकांचे एकमत होऊ लागले आहे. तसेच या साथीवर नियंत्रण मिळविल्यानंतरही जगभरातील परिस्थिती चटकन पूर्वपदावर येणे शक्य नाही, याची जाणीव जगभरातल्या प्रमुख देशांना झाली आहे. म्हणूनच दक्षिण कोरियाने ही साथ संपल्यानंतरही समस्यांचा सामना करण्यासाठी दोन वर्षांचा प्लॅन आताच तयार केला आहे.

ही साथ गेल्यानंतरही सर्वांना आपल्या जीवनशैलीत आणि कार्यशैलीत बदल करावेच लागतील, असे सांगून दक्षिण कोरियाच्या सरकारने हा नवा प्लॅन मांडला. या प्लॅननुसार दक्षिण कोरियाच्या जनतेला पुढचे दोन वर्ष वर्क स्मार्ट, एकट्याने प्रवास करणे आणि रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर वेळ न दवडता पटापट खाण्याची सवय लावून घेणे, यासारख्या सूचनांचा समावेश आहे. दक्षिण कोरियामध्ये कोरोनाव्हायरसचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर या देशाने वेगाने पावले उचलली होती. मोठ्या प्रमाणात चाचण्या करुन वेळीच या साथीवर नियंत्रण मिळविले. या मॉडेलचे देशभरात कौतुक झाले.

आता दक्षिण कोरियाच्या सरकारने दोन वर्षांचा प्लॅन तयार केला व त्याचे तपशील जाहीर केले. या प्लॅननुसार वर्क फॉर्म अर्थात घरातून काम करणाऱ्याला प्राधान्य देणे, व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मीटिंग घेणे, सोशल डिस्टसिंग पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे याबरोबरच ठिकठिकाणी शारीरिक तापमान चेक करण्याची व्यवस्था करण्यात येईल. बाहेर एकट्याने पडणे, टॅक्सी ऑनलाईन बुकिंग करणे, ऑनलाईन व्यवहार करणे हे बंधनकारक असेल. तसेच वेळ वाया न दवडता पटापटा खाण्याची सवय लावणे यासारख्या शिस्तीचा समावेश असेल. कोरोनाव्हायरसच्या साथीनंतर या जीवनशैलीचा स्वीकार करावाच लागेल, असे दक्षिण कोरियाच्या उपआरोग्य मंत्र्यांनी सांगितले आहे.

leave a reply