लॉकडाऊन १७ मे पर्यंत कायम राहणार

नवी दिल्ली – देशातील लॉकडाऊन आणखी दोन आठवड्याने वाढविण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. या काळात रेड आणि ऑरेंज झोन्समधील कोरोनाव्हायरसच्या संक्रमणाची साखळी तोडण्याकरिता धोरणे आखण्यात आली आहेत. यानुसार रेड झोनमध्ये अधिक सक्तीने लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्यात येणार असून रेड झोन आणि ऑरेंज झोनमधील कंटेनमेंट क्षेत्रात घराघरात जाऊन कोरोनाचे टेस्टिंग करण्यात येईल. मात्र ग्रीन झोनमध्ये येणाऱ्या जिल्ह्यात लॉकडाऊनचा नियम शिथिल केले जातील.

देशात चोवीस तासात कोरोनाव्हायरसमुळे ७३ जणांचा बळी गेला, तर सुमारे दोन हजार नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे देशात या साथीने दगावलेल्यांची संख्या १,१४७ वर गेली असून एकूण रुग्णांची संख्या ३५ हजाराच्या पुढे गेल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. मात्र या माहितीमध्ये शुक्रवारी दिवसभरातील विविध राज्यात सापडलेल्या रुग्णांची नोंद नाही. त्यामुळे प्रत्यक्षात शुक्रवारी रात्रीपर्यंत देशभरातील या साथीच्या रुग्णांची संख्या ३६ हजारांच्याही पुढे गेल्याचे समोर येत आहे. महाराष्ट्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे शुक्रवारी एकाच दिवसात राज्यात २६ जण दगावले, तर तब्बल १००८ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या ११,५०० च्या पुढे गेली आहे.

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी केंद्र सरकारने देशातील लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढविण्याची घोषणा केली. देशातील लॉकडाऊन तिसऱ्यांदा वाढविण्यात येत आहे. याआधी २५ मार्च ते १४ एप्रिल दरम्यान एकवीस दिवसाचा लॉकडाऊन झाला होता, तर त्यानंतर १५ एप्रिल ते ३ मे या एकोणवीस दिवसांच्या लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी सध्या सुरु आहे. हा लॉकडाऊन संपण्यास दोन दिवस असताना केंद्रीय गृहमंत्रालयाने आणखी दोन आठवड्याने लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा केली. मात्र यावेळी लॉकडाऊनमध्ये ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही अटींसह नियम शिथिल करण्यात येत आहेत. ग्रीन झोनमधील नियम बऱ्याच प्रमाणात शिथिल होणार आहेत. मात्र देशात रेल्वे, मेट्रो, विमानसेवा,शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण केंद्रे, हॉटेल्स, चित्रपटगृह, मॉल्स आणि धार्मिक स्थळे आधीप्रमाणे बंदच राहणार आहेत.

केंद्र सरकारने देशातील जिल्ह्यांचे रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये केलेल्या वर्गीकरणाची यादी अद्ययावत केली. याआधी दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनची घोषणा झाली तेव्हा देशातील १७० जिल्हे रेड झोनमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र आता देशातील रेड झोन्सची संख्या घटली असून ग्रीन आणि ऑरेंज झोन्सची संख्या वाढली आहे. शुक्रवारी आरोग्य मंत्रालयाने केलेल्या घोषणेनुसार देशातील १३० जिल्हे हे सध्या रेड झोनमध्ये आहेत. २८४ जिल्हे ऑरेंज झोन आणि ३१९ जिल्हे हे ग्रीन झोनमध्ये ठेवण्यात आले आहेत. २१ दिवसात एकही रुग्ण न आढळलेल्या जिल्ह्यांना यापुढे ग्रीन झोन घोषित केले जाईल. याआधी ही कालमर्यादा २८ दिवसांची होती. तसेच दर आठवड्याला ही रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनची यादी अद्यावत करण्यात येणार आहे.

रेड झोनमध्ये कोरोनाची साखळी तोडणे हे मोठे आव्हान आहे. रेड आणि ऑरेंज झोनमध्ये जेथे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, तेथे कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहेत. राज्यांना या कंटेन्मेंट झोन अर्थात कोरोनाचा रुग्ण सापडल्याने प्रतिबंधित केलेली क्षेत्रांची फेरसमीक्षा करण्यास केंद्र सरकारने सांगितले आहे. तसेच कंटेन्मेंट झोन घोषित करण्यासाठी मानक कार्यप्रणालीत (स्टॅंडर्ड ऑपरेशन प्रोसिजर-एसओपी) बदल करण्यात आले आहेत. या मानक नियमांअंतर्गत कंटेन्मेंट झोनची व्याप्ती वाढणार आहे. या साथीचे रुग्ण किती?, या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची संख्या व भौगोलिक फैलाव किती? यावर कंटेन्मेंट झोन ठरवून त्या भागात घराघरात संक्रमित रुग्णांचा शोध घेतला जाणार आहे.

सध्या देशातील मुंबई, दिल्ली, कोलकाता, पुणे, बंगळुरू, अहमदाबाद या सारखी मोठी शहरे रेड झोनमध्ये आहेत. रेड झोनमध्ये उत्तरप्रदेशातील सर्वाधिक जिल्हे असून या राज्यातील १९ जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील १४ जिल्हे आहेत. राज्यातील मुंबई, मुबई उपनगर, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, सातारा, पालघर, यवतमाळ, धुळे, अकोला आणि जळगाव हे जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. याशिवाय रायगड, अहमदनगर,अमरावती, बुलढाणा, नंदुरबार, कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, जालना, नांदेड, चंद्रपूर, परभणी, सांगली, लातूर, भंडारा आणि बीड हे जिल्हे ऑरेंज झोनमध्ये सामील आहेत. उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली आणि वर्धा हे राज्यातील केवळ सहा जिल्हे ग्रीन झोनमध्ये सामील आहेत.

गृहमंत्रालयाने जारी केलेल्या नियमावलीनुसार ग्रीन झोनमध्ये प्रवासी बस सेवा ५० टक्के क्षमतेनिशी चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे. येथे टॅक्सी सेवाही सुरु होईल. तसेच सलूनसह इतर दुकाने सुरु करण्यास परवानगी असेल. ग्रीन झोनमध्ये बहुतांश व्यवसायांना सूट देण्यात आली आहे. ऑरेंज झोनमध्ये केवळ टॅक्सी सेवेला परवानगी देण्यात आली आहे. चार चाकी खाजगी वाहनांमधून दोन प्रवाशांना घेऊन जाऊ शकतील.

leave a reply