संरक्षण दलांकडून रविवारी कोरोना योद्ध्यांना सलामी

नवी दिल्ली – ‘कोरोनाव्हायरसच्या विरोधी युद्धात लढत असलेल्या देशभरातील कोरोना योद्ध्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रविवारी भारतीय संरक्षणदलांकडून सलामी देण्यात येईल. देशाच्या कानाकोपऱ्यात संरक्षणदलांकडून विशेष कवायती केल्या जातील’, अशी घोषणा संरक्षणदल प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी केली. त्याचबरोबर तीनही दलांनी कोरोनाशी दोन हात करण्यासाठी पूर्ण तयारी केल्याचे संरक्षणदल प्रमुखांनी म्हटले आहे.

कोरोनाव्हायरसची साथ रोखण्यासाठी १७ मे पर्यंत लॉकडाउन वाढविण्यात आला आहे. या जीवघेण्या साथीपासून आपल्या देशबांधवांच्या रक्षणासाठी अविश्रांत परिश्रम करणाऱ्या देशातील डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कामगार, पोलीस, होमगार्ड, डिलिव्हरी बॉय आणि माध्यमे, या असंख्य कोरोना योद्धांना रविवारी ३ मे रोजी सलामी दिली जाणार आहे.

उत्तरेकडील जम्मू-काश्मिरच्या श्रीनगरपासून दक्षिणेकडील केरळच्या थिरुअनंतपुरम आणि आसामच्या दिब्रुगड ते गुजरातच्या कच्छपर्यंत वायुसेनेची विमाने ‘फ्लाय पास्ट’ करणार असे जनरल रावत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तर भारतीय लष्कराच्या ‘माऊंटन बँड’ पथकाद्वारे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांच्या जवळपास बँडद्वारे सलामी दिली जाईल.

नौदलाच्या युद्धनौकांकडून विशेष कवायती आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने किनारपट्टीजवळील रुग्णालयांवर पुष्पवृष्टी करण्यात येईल, अशी माहिती जनरल रावत यांनी दिली. लष्कराच्यावतीने ठिकठिकाणच्या पोलिसांच्या स्मृतीस्थळावर पुष्पचक्र अर्पण केले जाईल. भारतीय लष्कराच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी कारवाई होत आहे.

या साथीचा मुकाबला करण्यासाठी साऱ्या देशबांधवांची एकजूट असून या महामारीविरोधात आपला देश नक्की विजयी होईल, असा विश्वास देशाच्या संरक्षणदल प्रमुखांनी व्यक्त केला. भारतीय संरक्षणदलांनी देखील या साथीचा मुकाबला करण्यासाठी तयारी केली असून काही ठिकाणी विलगिकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. भारतीय लष्करातील १४ जणांना या साथीचा प्रादुर्भाव झाला होता, पण यातील पाच जवान पूर्णपणे बरे होऊन आपल्या ड्युटीवर रवाना झाल्याची माहिती लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी दिली. तर आखातातील भारतीयांच्या सुटकेसाठी नौदलाच्या युद्धनौकांचा ताफा सज्ज असून आदेशांची वाट पाहत असल्याचे नौदलप्रमुख अॅडमिरल करमबिर सिंग यांनी सांगितले.

leave a reply