लेफ्टनंट जनरल अनिल चौहान देशाचे नवे संरक्षणदलप्रमुख

नवी दिल्ली – संरक्षणदल प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघातात झालेल्या दुर्दैवी निधनानंतर नऊ महिन्यांनी नव्या संरक्षणदलप्रमुखांची घोषणा झाली आहे. जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतात दहशतवादविरोधी मोहीमा राबविण्याचा दांडगा अनुभव असलेले लष्कराचे निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान हे भारतीय संरक्षणदलाचे नवे प्रमुख असतील. लेफ्टनंट जनरल अनिल चौहान हे लष्करातून निवृत्तीनंतर भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि धोरणात्मक बाबींवर सरकारसोबत काम करीत होते.

Anil Chavanजनरल बिपीन रावत यांच्या अकाली अपघाती निधनानंतर नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) म्हणून कोणाला नेमण्यात येईल, याची प्रतिक्षा गेल्या नऊ महिन्यांपासून होती. संरक्षणदलांमधील समन्वय व सहकार्य वाढविण्यासाठी, तसेच देशाची सुरक्षा आणि संरक्षणदलासंदर्भातील निर्णय प्रक्र्रिया गतिमान करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी देशात प्रथमच ‘सीडीएस’ पदाची निर्मिती करण्यात आली होती. देशापुढील वाढत्या सुरक्षाविषयक आव्हानांचा विचार करता ‘सीडीएस’ पद असावे, अशी मागणी कित्येक वर्ष संरक्षणदल व तज्ज्ञांकडून केली जात होती. ही मागणी दोन वर्षांपूर्वी प्रत्यक्षात उतरली व देशाचे पहिले संरक्षणदलप्रमुख म्हणून जनरल बिपीन रावत यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात तमिळनाडूच्या कुन्नूर येथे झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात जनरल रावत यांना वीरमरण आले होते. या अपघातात जनरल रावत यांची पत्नी, तसेच वायुसेना व लष्कराचे 11 अधिकारीही शहीद झाले होते.

या अपघातानंतर नऊ महिन्यांनी लेफ्टनंट जनरल अनिल चव्हाण यांची नियुक्ती धोरणात्मकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या पदावर करण्यात आली आहे. लेफ्टनंट जनरल अनिल चव्हाण यांनी आपल्या 40 वर्षांच्या लष्करी सेवेत अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. भारतीय लष्कराचे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशन (डीजीएमओ) म्हणून त्यांनी जबाबदारी संभाळली होती. तसेच माजी लष्करप्रमुख मनोज मुकूंद नरवणे यांची लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यावर लेफ्टनंट जनरल अनिल चव्हाण पूर्व कमांडचे प्रमुख बनविण्यात आले होते. लेफ्टनंट जनरल चौहान यांना दहशतवादविरोधी मोहिमेचा दांडगा अनुभव असून पाकिस्तान सीमेनजीक जम्मू-काश्मीरमध्ये आणि चीन सीमेजवळ ईशान्य भारतात त्यांच्या नेतृत्वाखाली अशा कित्येक मोहीमा राबविण्यात आल्या आहेत.

लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांना त्यांच्या कामगिरीसाठी परम विशिष्ठ सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अती विशिष्ठ सेवा पदक, सेवा पदक, सेना पदक अशा सैन्य पदकांनी गौरवण्यात आलेले आहे. गेल्यावर्षी मे महिन्यात ते सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर ते सातत्याने देशाच्या सुरक्षेशी निगडित विषयावर काम करीत होते.

61 वर्षांचे लेफ्टनंट जनरल चौहान यांनी सीडीएस म्हणून आपला पदभार स्वीकारल्यानंतर त्यांना जनरलपद मिळेल. तसेच सीडीएस पदाबरोबर लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही कार्यरत असणार आहेत.

leave a reply