‘नॉर्ड स्ट्रीम’ इंधनगळतीवरून नाटो व युरोपिय महासंघाचा रशियावर ठपका

ब्रुसेल्स/मॉस्को – रशिया व युरोपिय देशांमध्ये उभारण्यात आलेल्या ‘नॉर्ड स्ट्रीम’ इंधनवाहिनीतून झालेल्या गूढ इंधनगळतीवरून नाटो व युरोपिय महासंघाने रशियावर ठपका ठेवला आहे. बाल्टिक सागरी क्षेत्रात रशियाची संरक्षणतैनाती मोठ्या प्रमाणात असून रशियानेच हा घातपात घडविला असल्याचा आरोप महासंघाच्या प्रमुख उर्सुला वॉन डेर लेयन यांनी केला. नाटोचे प्रमुख स्टॉल्टनबर्ग यांनीही त्याला दुजोरा दिला असून नाटो महासंघाच्या सहाय्याने रशियन कारवायांना प्रत्युत्तर देईल, असे बजावले आहे.

रशियाने आपल्यावरील आरोप फेटाळले असून ‘नॉर्ड स्ट्रीम’ला नुकसान झाल्यास सर्वाधिक फटका रशियालाच बसणार असल्याकडे लक्ष वेधले आहे. अमेरिकेतील अर्थतज्ज्ञ जिम रिकार्डस्‌‍ यांनी इंधनगळतीमागे अमेरिकाही असू शकते, असा खळबळजनक दावा सोशल मीडियावर केला.

Nord Streamसोमवारी डेन्मार्कचा भाग असलेल्या ‘बॉर्नहोम आयलंड’जवळच्या सागरी क्षेत्रात ‘नॉर्ड स्ट्रीम 2’ इंधनवाहिनीत गळतीची पहिली घटना उघडकीस आली होती. त्यानंतर डॅनिश यंत्रणांनी या सागरी क्षेत्रातील जहाजांना पाच नॉटिकल मैलांच्या परिसरात प्रवेश न करण्याचे आदेश दिले. मंगळवारी स्वीडनच्या सागरी क्षेत्रातील ‘नॉर्ड स्ट्रीम 1’ व ‘नॉर्ड स्ट्रीम 2’ या दोन्ही इंधनवाहिनीत गळतीची प्रकरणे समोर आली. ‘नॉर्ड स्ट्रीम 1’मध्ये दोन ठिकाणी गळती झाल्याचे स्वीडिश यंत्रणांनी सागितले. नव्या माहितीनुसार, या भागात स्फोटांचे आवाज ऐकू आले असून इंधनवायूची गळती सुरू झाल्याने सागरी पृष्ठभागावर मोठ्या क्षेत्रफळात ‘गॅस बबल्स’ दिसून येत आहेत. गळती सुरू असेपर्यंत हे बबल्स दिसत राहतील, असा दावा डेन्मार्क व स्वीडनच्या यंत्रणांनी केला. सागरी क्षेत्रात मिथेन वायूचे अस्तित्व असल्याने स्फोटाच्या घटनाही घडू शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात येते.

या प्रकरणात घातपात असू शकतो, असा दावा रशियाकडून पहिल्यांदा करण्यात आला होता. आता अमेरिकेसह नाटो व युरोपिय देश घातपाताचाच मुद्दा पुढे करीत असून त्यासाठी रशिया जबाबदार असल्याचा ठपका ठेवला आहे. मात्र इंधनवाहिनीतून पुरवठा बंद ठेवणारा रशिया असे पाऊल का उचलेल, असा सवाल विश्लेषक तसेच रशियन माध्यमे करीत आहेत. अमेरिकेतील एक अर्थतज्ज्ञ जिम रिकार्डस्‌‍ यांनी ‘नॉर्ड स्ट्रीम’च्या घातपातातून अमेरिकेची अनेक उद्दिष्टे साध्य होऊ शकतात, याकडे लक्ष वेधले आहे. पुतिन यांची कोंडी करण्यासह युद्धाला अधिक चिथावणी देणे तसेच युरोपला अमेरिकेवर अधिक अवलंबून राहण्यास भाग पाडणे यांचा त्यात समावेश असू शकतो, असा दावा रिकार्डस्‌‍ यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये केला आहे.

leave a reply