लुकाशेन्को यांना बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष म्हणून मान्यता देणार नाही

- अमेरिका व युरोपिय महासंघाने बजावले

मिन्स्क – बेलारुसमध्ये झालेल्या निवडणुकीत कायदेशीर रित्या निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष म्हणून अलेक्झांडर लुकाशेन्को यांना मान्यता मिळणार नाही, असे अमेरिका व युरोपिय महासंघाने बजावले आहे. लुकाशेन्को यांनी बुधवारी एका कार्यक्रमात आपला शपथविधी उरकल्याचे समोर आले होते. त्यावर अमेरिका व युरोपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून लुकाशेन्को यांची कृती बेलारुसच्या जनतेचा विश्वासघात करणारी असल्याचा आरोपही करण्यात आला. या पार्श्वभूमीवर, रशिया व बेलारुसमध्ये ‘स्लाव्हिक ब्रदरहूड’ या नावाने लष्करी सरावाला सुरुवात झाली असून, रशियाने आपल्या ‘पॅराट्रुपर्स’ची तुकडी उतरविल्याची माहिती समोर आली आहे.

९ ऑगस्टला बेलारुसमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पार पडली होती. गेली २६ वर्षे बेलारुसचे नेतृत्व करणाऱ्या लुकाशेन्को यांनी या निवडणुकीत आपल्याला ८० टक्क्यांहून अधिक मते मिळाल्याचा दावा केला होता. त्यांच्या प्रतिस्पर्धी स्वेतलाना तिखानोव्हस्काया यांना १० टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळाल्याचे सांगण्यात आले. मात्र निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे आरोप राजकीय पक्ष व आंतरराष्ट्रीय समुदायाकडून करण्यात येत असून, लुकाशेन्को यांच्याविरोधात व्यापक निदर्शने सुरू झाली आहेत. दीड महिन्याहून अधिक काळ सुरू असणाऱ्या या आंदोलनाला अमेरिकेसह युरोपीय देशांनी समर्थन दिले आहे. सुरुवातीला आंदोलनाला विरोध न करणाऱ्या रशियन राजवटीने गेल्या काही दिवसात आपली भूमिका आक्रमक केली आहे. अमेरिका व युरोपीय देशांनी या आंदोलनात हस्तक्षेप करू नये असे रशियाने बजावले आहे.

लुकाशेन्को यांना बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष म्हणून मान्यता देणार नाही - अमेरिका व युरोपिय महासंघाने बजावलेरशियाचे समर्थन मिळविण्यात यशस्वी ठरलेल्या लुकाशेन्को यांनी विरोध मोडून काढण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. बुधवारी अचानक पार पडलेला शपथविधी त्याचाच भाग असल्याचे मानले जाते. संकटाच्या काळात मी बेलारुसियन जनतेला वाऱ्यावर सोडू शकत नाही, असा दावा करीत लुकाशेन्को यांनी बुधवारी झालेल्या शपथविधीचे समर्थन केले. मात्र त्यावर बेलारूससह आंतरराष्ट्रीय पातळीवरून तीव्र प्रतिक्रिया उमटली. बेलारुसच्या अनेक शहरांमध्ये नव्याने निदर्शने सुरू झाली असून सुरक्षादले व आंदोलकांमध्ये हिंसक झटापटी झाल्याची माहिती समोर आली आहे.

अमेरिका व युरोपिय देशांनी लुकाशेन्को यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून मान्यता देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. ‘अमेरिका अलेक्झांडर लुकाशेन्को यांना बेलारुसचे अधिकृत नेते म्हणून मान्यता देणार नाही. चर्चेच्या माध्यमातून तसेच मुक्त वातावरणात बेलारुसच्या जनतेला त्यांचा नेता निवडण्याचा अधिकार मिळणे हाच योग्य मार्ग आहे’, या शब्दात अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने लुकाशेन्को यांना फटकारले. बुधवारी पार पडलेला कथित शपथविधी व बहुमताचा दावा याला लोकशाहीच्या दृष्टीने कसलाही आधार नसल्याचा दावा युरोपिय महासंघाने केला. लुकाशेन्को यांनी बेलारुसच्या जनतेचा विश्वासघात केला असून, यामुळे बेलारुसमधील राजकीय संकट अधिकच चिघळेल, असा इशाराही महासंघाने दिला. बेलारुसला देण्यात येणारे अर्थसहाय्य पूर्णपणे रोखण्यात येईल, असेही बजावण्यात आले आहे.

लुकाशेन्को यांना बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष म्हणून मान्यता देणार नाही - अमेरिका व युरोपिय महासंघाने बजावलेआंतरराष्ट्रीय स्तरावरून बेलारुसवरील दडपण वाढत असतानाच, रशियाने पुन्हा एकदा आपण लुकाशेन्को यांच्याबरोबर असल्याचे संकेत दिले आहेत. रशिया व बेलारुसमध्ये ‘स्लाव्हिक ब्रदरहूड’ नावाचा संयुक्त लष्करी सराव सुरु झाला आहे. या सरावात रशियाचे ९०० हुन अधिक जवान सहभागी झाले आहेत. सरावादरम्यान रशियाने आपल्या ‘पॅराट्रुपर्स’ची तुकडी उतरवली असून सशस्त्र वाहने व हेलिकॉप्टर्सही तैनात केल्याचे सांगण्यात येते. रशियाच्या ‘टीयु-१६० बॉम्बर्स’नी अण्वस्त्रांसहित बेलारुसच्या हद्दीतून उड्डाण केल्याची माहिती बेलारुसच्या सरकारी माध्यमांनी दिली आहे. लष्करी सरावादरम्यान रशियन बॉम्बर्सनी घेतलेला हा सहभाग लक्ष वेधून घेणारा ठरला आहे.

leave a reply