महाराष्ट्रात चोवीस तासात कोरोनाने १३९ जणांचा बळी

मुंबई – महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात १३९ जणांचा कोरोना रुग्णांचा बळी गेला आहे. तसेच सुमारे २८ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या आठवडभराच्या तुलनेत मंगळवारी सापडलेल्या कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या घटली असली तरी या साथीने दगावणार्‍यांची संख्या वाढली आहे. याबातीत पुणे आणि नागपूरमध्ये परिस्थिती बिकट आहे. या दोन्ही मंडळात गेल्या चार दिवसांपासून दिवसाला कोरोनाचे ५० हून अधिक रुग्ण दगावत आहेत.

महाराष्ट्रात मंगळवारी एका दिवसात आढळलेल्या नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. चोवीस तासात २७ हजार ९१८ नवे रुग्ण आढळले. यामुळे महाराष्ट्रात आतापर्यंत नोंद झालेल्या कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या २७ लाख ७३ हजारांच्या पुढे गेली आहे. तसेच मंगळवारी २३ हजार ८२० रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच राज्यात एका दिवसात कोरोनाच्या १३९ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे राज्यात आतापर्यंत या साथीने दगावलेल्यांची संख्या ५४ हजार ४२२ वर गेली आहे. तसेच महाराष्ट्रातील ऍक्टिव्ह केसेसची संख्या ३ लाख ४० हजार ५४२ वर पोहोचली आहे.

मुंबईत ४७२८ नवे रुग्ण आढळले असून १० जणांचा बळी गेला आहे. तर मुंबईसह एकूण ठाणे मंडळात ८८०७ नवे रुग्ण आढळले आहेत. पुणे मंडळात ७७१८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच नाशिक मंडळात ५०७८, नागपूर मंडळात १३६३, लातूर मंडळात २१८३, औरंगाबाद मंडळात २०७८ रुग्ण आढळले आहेत.

रुग्ण संख्येत घट दिसून आली, तरी बळींची संख्या वाढली आहे. विशेषत: नागपूर आणि पुण्यामध्ये कोरोनाने होणारे मृत्यू वाढले आहेत. नागपूर जिल्ह्यातच चोवीस तासात ५४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. पुण्यामध्येही ५० हून अधिक जण दगावले आहेत. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मृतांची संख्या वाढत आहे.

राज्यातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता राज्य शासनाने ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा वैद्यकीय क्षेत्राला प्राधान्याने व्हावा अशा सूचना दिल्या आहेत. ८० टक्के पुरवठा हा वैद्यकीय कारणासाठी व्हावा आणि औद्योगिक करणासाठी २० टक्के पुरवठा व्हावा, असे आदेश राज्याच्या आरोग्य मंत्रालयाकडून काढण्यात आले. रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा सुरळीत रहावा यासाठी हे आदेश देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य विभागाने महाराष्ट्रासह रुग्ण वाढत असलेल्या राज्यांना संस्थांत्मक क्वारंटाईनवर भर देण्याच्या सूचना दिल्या. कित्येक राज्ये ही कोरोनाच्या रुग्णांना व त्यांच्या संपर्कात आलेल्यांना घरातच क्वारंटाईन करण्यावर भर देत आहेत. मात्र घरात त्यांच्यावर योग्यरित्या देखरेख ठेवली जात आहे का याबाबत प्रश्‍न आहे. निष्काळजीपणामुळे कोरोनाची लागण इतरांना होण्याची शक्यता आहे. आताही कित्येक जण लस आल्याने निष्काळजीपणा दाखवून मास्क लावणे, सोशल डिस्टंन्सिंगचे नियम पाळत नसल्याने रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे संस्थात्मक क्वारंटाइन करून संसर्ग नियंत्रणात आणावा असे, कंेंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी म्हटले आहे.

leave a reply