महाराष्ट्र एटीएसकडून सात किलो युरेनियमसह दोघांना अटक

युरेनियमसह दोघांना अटकमुंबई – महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाने सात किलो युरेनियमसह दोघांना अटक केली आहे. या युरेनियमची विक्री करण्यात येणार होती. हे युरेनियम कोणाला विकण्यात येणार होते, या दोघांनी हे युरेनियम कुठून मिळविले. या प्रश्‍नांचा उकल करण्यासाठी आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे. तसेच सापडलेल्या या युरेनियमची गुणवत्ता आरोपींनी एक प्रयोगशाळेतून तपासली होती, अशी माहिती समोर येत आहे. या प्रयोगशाळेचाही शोध सध्या सुरू आहे.

जिगर पांड्यो आणि आबू ताहिर अफझल हुसेन चौधरी अशी एटीएसने अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार जिगर पांड्या याला १४ फेब्रुवारीला ठाण्यातून अटक करण्यात आली होती व त्याच्याजवळ बहुमोल किंमतीच्या पदार्थाचे काही तुकडे असल्याचे व तो त्याची विक्री करण्यासाठी ग्राहकांना शोधत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर त्याला सापळा लावून ताब्यात घेण्यात आले होते. हे युरेनियम असल्याचे उघड झाल्यावर पांड्याची कसून चौकशी करण्यात आली. त्याच्या चौकशीत आबू ताहिरचे नाव समोर आले. आबू ताहिरनेच आपल्याला हे तुकडे दिल्याची माहिती पांड्या याने दिली होती.

यानंतर आबू ताहिरचा माग काढत त्याला मानखुर्दमधून अटक करण्यात आल्याची माहिती एटीएसने दिली आहे. मानखुर्द येथील कुर्ला स्क्रॅप असोसिएशनच्या आवारातून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याजवळ ७.१०० किलो नैसर्गिक स्वरुपातील युरेनियम सापडले आहे. याची किंमत २१ कोटीहून अधिक आहे.

युरेनियम हा प्रचंड किरणोत्सर्गी पदार्थ असून अणुऊर्जा, अण्वस्त्रांमध्ये त्याचा वापर केला जातो. तसेच काही संवेदनशील वैद्यकीय उपकरणात युरेनियम वापरले जाते. युरेनियम हे मानवी जिवनासाठी प्रचंड घातक असते. यातून किरणोत्सर्ग झाल्यास कित्येकांचे प्राणही जाऊ शकतात. एटीएसने जप्त केलेले युरेनियम हे भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरकडे (बीएआरसी) तपासणीसाठी देण्यात आले होते. त्यांनी सापडलेले युरेनियम हे ९० टक्के शुद्ध असल्याचा अहवाल दिल्याची माहिती एटीएसचे उपमहानिरिक्षक शिवदिप लांडे यांनी दिली.

यामागे कोणता दहशतवादी हात असल्याचे आतापर्यंत स्पष्ट झालेले नाही. मात्र इतका घातक किरणोत्सर्गी पदार्थ या दोघांना कुठून मिळाला. तसेच या दोघांनी त्याची शुद्धता तपासण्यासाठी एका प्रयोगशाळेची मदत घेतली होती. कोणत्या प्रयोगशाळेत याची शुद्धता तपासण्यात आली. तसेच त्यांना या युरेनियमसाठी ग्राहक मिळाला होता का? याची विक्री कोणाला करण्यात येणार होती? या प्रश्‍नांच्या उत्तरे मिळविण्याचा प्रयत्न एटीएस करीत आहे.

दरम्यान या दोघांवर ऍटोमिक एनर्जी ऍक्ट-१९६२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नागपूरच्या ऍटोमिक मिनरल्स डायरोक्टरेट ऑफ एक्सप्लोरेशन ऑफ रिसर्चने यासंदर्भात तक्रार नांेंदविली आहे. या दोन्ही आरोपींना एटीएसने न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना १२ मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.

leave a reply