महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकमध्ये डबल म्यूटेशन कोरोनामुळे संक्रमण वाढले

- उत्तरेकडील राज्यांमध्ये ब्रिटन व्हेरियंटचे अधिक रुग्ण

डबल म्यूटेशनमुंबई – भारतात मार्चपासून अचानक वाढलेल्या कोरोनाच्या संक्रमणास कोरोनाचा डबल म्यूटेशन ‘बी.१.६१७’ हा प्रकार जास्त संक्रमण पसरविणारा ठरल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. तसेच ‘बी.१’ हा कोरोनाचा आणखी एक प्रकार दक्षिणेकडील राज्यांमध्ये वेगाने संसर्ग वाढवित असल्याचा दावाही संशोधकांनी केला आहे. तर ब्रिटीश व्हेरियंटमुळे उत्तरेकडील पंजाब आणि दिल्लीसारख्या राज्यांमध्ये अधिक रुग्ण वाढल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये अधिक वेगाने संक्रमण पसरत असून यासाठी ‘बी.१.१६७’ हा डबल म्युटंन व्हेरियन्ट कारणीभूत असल्याचे संशोधकांचा दावा आहे. याआधीही नव्या लाटेसाठी डबल म्युटेशन कोरोना विषाणू कारणीभूत असल्याचे दावे करण्यात आले होते. मात्र कमी नमुन्यांचे विश्‍लेषण झाल्याने याबाबत स्पष्ट दावा करण्यात आला नव्हता.

गुरुवारी ‘नॅशनल सेंटर फॉर डिसिज कन्ट्रोल’चे (एनसीडीसी) संचालक सुजित सिंग यांनी गेल्या चार महिन्यात जिनोम विश्‍लेषणासाठी पाठविण्यात आलेल्या सर्व नमुन्याच्या आधारावर डबल म्युटेशन कोरोना अधिक संक्रमण पसरविणारा ठरत असल्याचे स्पष्ट केले आहे. विशेषत: महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात या राज्यांमध्ये आढळत असलेल्या रुग्णांमागे हा डबल म्युटेशन कोरोना विषाणू कारणीभूत आहे, असे सुजित सिंग म्हणाले. डिसेंबरपासून देशातील १० प्रमुख सरकारी प्रयोगशाळांमध्येे एकूण १८ हजार ५३ नमुने जिनोम सिक्वेन्सच्या विश्‍लेषणासाठी आले. या जिनोम विश्‍लेषणासाठी येणार्‍या नमुन्यांची त्यातून निघणार्‍या निष्कर्षांची माहिती फेब्रुवारीमध्ये दोन वेळा, मार्च आणि एप्रिल महिन्यात प्रत्येकी चार वेळा देण्यात आली होती. मात्र आतापर्यंत सर्व नमुन्यातून काढण्यात आलेला निष्कर्ष सुजित सिंग यांनी मध्यमांना दिला.

यानुसार उत्तर भारतात पंजाब, दिल्लींमधून आलेल्या नमून्यांमध्ये ब्रिटन व्हेरियंट ‘बी१.१.७’चा जास्त प्रमाणात समावेश होता. पंजाबमधून आलेल्या नमुन्यांमध्ये ४८२, तर दिल्लीतील ५१६ नमुने हे ब्रिटीश व्हेरियंटचे सापडले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटकमधून विश्‍लेषणासाठी आलेल्या नमुन्यांमध्ये ब्रिटीश व्हेरियंट आढळला आहे. मात्र त्याची संख्या अनुक्रमे ८३ आणि ८२ आहे. तेच महाराष्ट्रातील ७१६ नमुने हे ‘बी.१.६१७’ या डबल म्युटेशन कोरोनाचे निघाले आहेत. गुजरात, कर्नाटक, पश्‍चिम बंगालमधील नमुन्यांमध्येही डबल म्युटेशनचे प्रमाण अधिक आहे.

दक्षिण आफ्रिकन व्हेरियंट ‘बी.१.३१५’ हा तेलंगणात आणि दिल्लीतील काही नमुन्यांमध्ये आढळला आहे. तर कोरोनाचा ब्रिझिल व्हेरियंट ‘पी१’ हा केवळ महाराष्ट्रातील नमुन्यांमध्ये मिळाला आहे. मात्र त्याची संख्या नगण्य आहे, अशी माहिती सुजित सिंग यांनी दिली. आरोग्य मंत्रालय आणि एनसीडीसीकडून सातत्याने राज्य सरकारांना त्यांच्या राज्यातून नमूण्यांमध्ये सापडत असलेल्या व्हेरियंटच्या प्रमाणाबद्दल सातत्याने माहिती देण्यात येत आहे. तसेच नव्या व्हेरियंटबाबत सावध राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, ‘सेंटर फॉर सेल्यूलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी’च्या (सीसीएमबी) संशोधकांनी ‘एन४४०के’ (बी.१.३६) हा आंध्र प्रदेशात आढळलेला कोरोनाचा व्हेरियंट अधिक घातक असल्याच्या बातम्या अफवा असल्याचे म्हटले आहे. कोरोनाचा हा प्रकार गेल्यावर्षीच आंध्र प्रदेश, कर्नाटक व तेलंगणामध्ये आढळला होता. यामुळे या राज्यांमध्ये संक्रमण वाढले होते. मात्र मार्चमध्ये हे संक्रमण अचानक कमी होत गेले. त्यामुळे कोरोनाचा हा व्हेरियंट लवकरच लोप पावण्याच्या स्थितीत असल्याचा दावा ‘सीसीएमबी’ने केला आहे. आंध्र प्रदेशच्या कोविड कमांड सेंटरचे प्रमुख डॉ. के. एस. जवाहर रेड्डी यांनीही हे स्पष्ट केले आहे.

आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणामध्ये कोरोनाचे सध्या ‘बी.१.१६७’ हा डबल म्युंटन स्ट्रेन आणि ‘बी.१’ स्ट्रेन जास्त प्रमाणात फैलावत आहे. या दोन्ही स्ट्रेनचे संक्रमण पसरविण्याचे प्रमाण अधिक आहे. कोरोनाच्या ‘एन४४०के’ या व्हेरियंटची जागा आता या दोन्ही व्हेरियंटनी घेतल्याचा संशोधकांचा दावा आहे.

leave a reply