‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ची चळवळ आता सुरू झाली आहे

- माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

चळवळवॉशिंग्टन – ‘अमेरिकेला पुन्हा महान बनविण्याचे उद्दिष्ट असलेली आपली ऐतिहासिक व राष्ट्रवादी चळवळ आता कुठे सुरू झाली आहे’, असा संदेश अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी जनतेला दिला. येणार्‍या काळात आपण जनतेबरोबर अनेक गोष्टींची देवाणघेवाण करणार असून अमेरिकी नागरिकांसाठी देशाला सर्वोत्तम बनविण्यासाठीचा संघटीत व जबरदस्त प्रवास यापुढेही चालू राहिल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकी संसदेत दुसर्‍यांदा दाखल करण्यात आलेला महाभियोग प्रस्ताव सिनेट मध्ये अपयशी ठरल्यानंतर ट्रम्प यांनी हा संदेश दिला. ट्रम्प यांच्या बाजूने लागलेल्या निकालाचे अमेरिकेच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठे परिणाम दिसून येतील, असे दावे विश्‍लेषक तसेच राजकीय नेते करीत आहेत.

Advertisement

गेल्या आठवड्यात माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकी संसदेच्या सिनेटमध्ये ‘महाभियोग प्रस्ताव’ दाखल करण्यात आला होता. जानेवारी महिन्यात अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये कॅपिटल हिलवर झालेल्या हिंसाचारासाठी ट्रम्प यांनी चिथावणी दिली, असा आरोप त्यात ठेवण्यात आला होता. ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्षपदाची मुदत संपल्यानंतर करण्यात आलेली ही कारवाई म्हणजे डेमोक्रॅट पक्षाने राष्ट्राध्यक्षपदाविरोधात पुकारलेले युद्ध असल्याचा आरोप रिपब्लिकन नेत्यांनी केला होता. ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्यांच्या वकिलांनी संसदेत बाजू मांडली. सिनेटमधील मतदानात ५७ सदस्यांनी ट्रम्प दोषी असल्याचा कौल दिला तर ४३ सदस्यांनी त्याला विरोध केला.

महाभियोग प्रस्तावाला मंजुरीसाठी ६७ मतांची मान्यता आवश्यक होती. मात्र त्यासाठी १० मते कमी पडल्याने ट्रम्प यांच्याविरोधात कारवाईचा प्रयत्न अपयशी ठरला. रिपब्लिकन पक्षाच्या सात सदस्यांनी ट्रम्प यांच्याविरोधात मतदान केले. संसदेतील कारवाईतून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर काही मिनिटातच माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी एक निवेदन जारी केले. त्यात त्यांनी, आपली बाजू लढविणार्‍या कायदेतज्ज्ञांचे तसेच राज्यघटनेच्या बाजूने उभे राहिलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांचे आभार मानले आहेत. आपल्याविरोधात दुसर्‍यांदा महाभियोग दाखल करण्याचा प्रयत्न हा डेमोक्रॅट पक्षाकडून राजकीय सूडबुद्धिने राबविण्यात येणार्‍या मोहिमेचा भाग असल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन व सभापती नॅन्सी पेलोसी यांनी सिनेटमधील निकालावर नाराजी व्यक्त केली. ट्रम्प यांची मुक्तता होणे, हा आपल्या इतिहासातील एक दुःखद धडा असल्याचे बायडेन यांनी म्हटले आहे. या घटनेतून अमेरिकेतील लोकशाही किती तकलादू आहे हे दिसून येते, असा दावाही त्यांनी केला. सिनेटमधील निकाल म्हणजे अमेरिकी राज्यघटनेला बसलेली सणसणीत चपराक असल्याची टीका सभापती नॅन्सी पेलोसी यांनी केली आहे. यावेळी त्यांनी ट्रम्प यांच्या बाजूने मतदान करणार्‍या रिपब्लिकन संसद सदस्यांचीही निर्भत्सना केली. हे संसद सदस्य भित्र्यांचा गट असल्याचे पेलोसी यांनी म्हटले आहे.

अमेरिकेच्या इतिहासात दोनदा महाभियोगाची कारवाई होणारे डोनाल्ड ट्रम्प हे पहिलेच राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. त्याचवेळी माजी राष्ट्राध्यक्षांविरोधात महाभियोगाची कारवाई होण्याचीही ही पहिलीच घटना ठरली आहे. जानेवारी महिन्यात झालेली हिंसा व संसदेतील कारवाईच्या मुद्यावर रिपब्लिकन पक्षात मोठे मतभेद समोर आले असले तरी ट्रम्प यांना मोठ्या प्रमाणात समर्थन असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे येणारा काळ रिपब्लिकन पक्षाच्या अस्तित्त्वासाठी निर्णायक ठरेल, असे सांगण्यात येत आहे. पुढील काळात ट्रम्प पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवतील, असे संकेतही देण्यात आले आहेत.

leave a reply