पहिल्या महायुद्धात ऑटोमन साम्राज्याने केलेले अर्मेनियन्सचे हत्याकांड म्हणजे वंशसंहार होता

- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची घोषणा

वॉशिंग्टन – पहिल्या महायुद्धाच्या काळात ऑटोेमन साम्राज्याने घडविलेले अर्मेनियन्सचे हत्याकांड म्हणजे वंशसंहारच होता, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी घोषित केले आहे. आपल्याला ऑटोमन साम्राज्याचा वारसदार मानणार्‍या तुर्कीची यावर जहाल प्रतिक्रिया उमटली आहे. अमेरिकेच्या राजदूतांना बोलावून तुर्कीच्या सरकारने याचा निषेध नोंदविला आहे. तर अमेरिकेने घेतलेल्या या निर्णयाचे अर्मेनियात स्वागत होत असून अमेरिकेतील अर्मेनियन्ससह काही मानवाधिकार संघटनांनीही यावर समाधान व्यक्त केले आहे. नाटोचा सदस्यदेश असलेल्या तुर्कीच्या विरोधात हा निर्णय घेऊन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी आपल्या निवडणूक प्रचारात दिलेल्या आश्‍वासनाची पुर्तता केल्याची चर्चा अमेरिकन माध्यमे करीत आहेत.

पहिल्या महायुद्धाच्या काळात १९१५ सालात ऑटोमन साम्राज्याने सुमारे १५ लाख अर्मेनियन्सची हत्या केली होती. आत्ताच्या तुर्कीमध्ये असलेल्या आन्तोलियामध्ये बहुुसंख्येने असलेल्या अर्मेनियन्सना यामुळे जीवाच्या भीतीने सिरियाच्या वाळवंटी भागाकडे धाव घ्यावी लागली होती. हा अत्याचार अर्मेनियन जनता कधीही विसरली नाही. म्हणूनच अर्मेनिया व पाश्‍चिमात्य देशांमध्ये असलेल्या अर्मेनियन्सकडून या भयंकर हत्याकांडाला नरसंहार मानले जावे, अशी मागणी केली जात होती. आपल्या पूर्वजांचा ऑटोमन साम्राज्याकडून नरसंहार झाला होता, हे सर्वांनी मान्य करावे, असे कळकळीचे आवाहन अर्मेनियन्स सातत्याने करीत होते. आत्तापर्यंत ३० देशांनी या हत्याकांडाला नरसंहाराचा दर्जा दिला होता व यामध्ये फ्रान्स, रशिया व कॅनडासारख्या देशांचा समावेश होता. पण अमेरिकेने याबाबत निर्णय घेतला नव्हता.

मात्र शनिवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी १९१५ सालचे हे हत्याकांड म्हणजे नरसंहारच होता, असे जाहीर करून टाकले. यावर अर्मेनियाने समाधान व्यक्त केले आहे. अर्मेनियाचे पंतप्रधान पशिनियान यांनी सत्य आणि न्याय यांचा विजय झाल्याचे सांगून यासाठी बायडेन यांनी ऐतिहासिक पाऊल उचलले, अशा शब्दात राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची प्रशंसा केली. हा आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मानवाधिकारांच्या रक्षणासाठी मिळालेला फार मोठा संदेश असल्याचा दावा अर्मेनियन पंतप्रधानांनी केला आहे.

मात्र तुर्कीतून यावर जहाल प्रतिक्रिया उमटली. तुर्कीचे परराष्ट्रमंत्री मेवलूत कावूसोग्लू यांनी अमेरिकेवर या प्रकरणी तोफ डागली आहे. शंभर वर्षांपूर्वीचे घाव भरण्यासाठी प्रयत्न करण्याचे सोडून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी या जखमा उकरून काढल्या आहेत. ही बाब सदर क्षेत्राच्या स्थैर्य व शांततेसाठी हितावह ठरणार नाही, असा दावा तुर्कीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला. तसेच तुर्कीने या प्रकरणी आपल्या देशातील अमेरिकन राजदूतांना समन्स बजावून याचा निषेध व्यक्त केला आहे. यामुळे अमेरिका व तुर्कीचे संबंध अधिकच ताणले गेले आहेत. याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांचा उल्लेख हुकूमशहा असा केला होता. त्याचाही दाखला अमेरिकी माध्यमे देत आहेत.

तुर्कीच्या विरोधात व अर्मेनियाच्या बाजूने हा निर्णय घेऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आपण मानवाधिकारांसाठी खडे ठाकणार असल्याचा संदेश सार्‍या जगाला देऊ पाहत आहेत, असा दावा केला जातो. मात्र नाटोचा सदस्य असलेल्या तुर्कीच्या विरोधातील हा निर्णय नाटोच्या एकजुटीवर प्रहार करणारा ठरेल, याकडे विश्‍लेषक लक्ष वेधत आहेत.

leave a reply