भारतीय कंपन्यांच्या गुंतवणुकीमुळे अमेरिकेत लाखो नोकऱ्यांची निर्मिती

- ‘सीआयआय’च्या ‘इंडियन रूट्स, अमेरिकन सॉईल’चा दावा

वॉशिंग्टन – एअर इंडिया अमेरिकेच्या बोईंग कंपनीकडून सुमारे 220 प्रवासी विमाने खरेदी करणार आहे. यामुळे अमेरिकेत तब्बल दहा लाख नोकऱ्यांची निर्मिती होणार असल्याचे अमेरिकेच्याच राष्ट्राध्यक्षांनी म्हटले होते. याला तीन महिने उलटत नाही तोच भारतीय कंपन्यांच्या गुंतवणुकीमुळे अमेरिकेला होणाऱ्या लाभाची अधिक माहिती समोर आली आहे. 163 भारतीय कंपन्यांनी अमेरिकेत सुमारे 40 अब्ज डॉलर्स इतकी गुंतवणूक केली असून यामुळे अमेरिकेत सव्वाचार लाख इतकी नोकऱ्यांची निर्मिती झाली आहे. अमेरिकेत बेरोजगारी वाढत असताना, भारतीय कंपन्यांची गुंतवणूक अमेरिकन अर्थव्यवस्थेसाठी उपकारक ठरत असल्याचे यामुळे उघड झाले आहे.

भारतीय कंपन्यांच्या गुंतवणुकीमुळे अमेरिकेत लाखो नोकऱ्यांची निर्मिती - ‘सीआयआय’च्या ‘इंडियन रूट्स, अमेरिकन सॉईल’चा दावा‘कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री-सीआयआय’ने बुधवारी ‘इंडियन रूट्स, अमेरिकन सॉईल’ नावाचा अहवाल प्रकाशित केला. या कार्यक्रमाला भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजित सिंग संधू उपस्थित होते. तसेच अमेरिकेने भारतासाठी आपले राजदूत म्हणून नियुक्त केलेले एरिक ग्रॅसिटी देखील यावेळी उपस्थित होते. 163 भारतीय कंपन्यांनी अमेरिकेत तब्बल 40 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. यामुळे अमेरिकेत 4.25 लाख इतक्या नोकऱ्यांची निर्मिती झाली. तसेच कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात सामाजिक दायित्त्वाच्या अंतर्गत भारतीय कंपन्यांनी अमेरिकेत 18.5 कोटी डॉलर्स इतका खर्च केला आहे. तर संशोधन आणि विकासासाठी भारतीय कंपन्यांनी अमेरिकेत सुमारे 100 कोटी डॉलर्स इतकी गुंतवणूक केली आहे, अशी माहिती राजदूत तरणजित सिंग संधू यांनी दिली.

भारतीय कंपन्यांच्या या गुंतवणुकीमुळे अमेरिकेला अधिक सशक्त बनविले असून यामुळे अमेरिकेतील स्पर्धात्मकता अधिकच वाढली आहे. यामुळे नोकऱ्यांच्या निर्मितीबरोबरच, स्थानिक अमेरिकन समुदायाला भारतीय कंपन्यांकडून भरीव सहाय्य मिळत असून त्यांच्या संपन्नतेत यामुळे भर पडली आहे, असा दावा राजदूत संधू यांनी केला. भारतीय कंपन्या अमेरिकेतील शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांशी जोडलेल्या आहेत. आपले यश सर्वांसोबत वाटून घेण्यावर भारताचा विश्वास आहे. अमेरिकेत भारतीय कंपन्या आपल्या यशात इतरांना सहभागी करून घेऊन, हेच धोरण राबवित आहेत, असा दावा राजदूत संधू यांनी केला.

जगभरातील गुंतवणूकदारांच्या आकर्षणाचे केंद्र म्हणून भारत उदयाला येत आहे. यामुळे भारतातील थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ सातत्याने वाढत आहे. मात्र भारत केवळ गुंतवणूक स्वीकारणारा देश नाही, तर भारतीय कंपन्याकडून महासत्ता असलेल्या अमेरिकेतही गुंतवणूक केली जात असल्याची बाब ‘इंडियन रूट्स, अमेरिकन सॉईल’च्या अहवालातून समोर आली आहे.

अमेरिकेतील बेरोजगारीचा दर चिंताजनकरित्या वाढत चालला आहे. आर्थिक मंदीची शक्यता वाढत असताना, अमेरिकन कंपन्यांनी कपातीचे धोरण स्वीकारले असून कित्येक कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी केले आहे. यामुळे बेरोजगारीची समस्या अधिकच उग्र बनली असून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसमोरील हे फार मोठे संकट मानले जाते. अशा परिस्थितीत भारतीय कंपन्यांची अमेरिकेतील गुंतवणूक व त्यामुळे होणारी रोजगारनिर्मिती निदान काही प्रमाणात अमेरिकेसाठी उपकारक ठरत आहे. यामुळे भारताची आर्थिक प्रगती अमेरिकेच्या हिताची असल्याचे अमेरिकन राजनैतिक अधिकारी व अर्थतज्ज्ञांकडून केले जाणारे दावे प्रत्यक्षात उतरत असल्याचे दिसते.

हिंदी English

 

leave a reply