नायजेरियामध्ये आयएसच्या दहशतवाद्यांकडून 20 अल्पसंख्यांकांचे निर्घृण हत्याकांड

अबुजा – आफ्रिकेत प्रभाव वाढवित असलेल्या ‘आयएस’च्या दहशतवाद्यांनी नायजेरियामध्ये भीषण हत्याकांड घडविले. नायजेरियामध्ये धार्मिक अल्पसंख्यांक असलेल्या 20 ख्रिस्तधर्मियांची या दहशतवाद्यांनी गळा चिरून हत्या घडविली. याचा व्हिडिओ प्रसिद्ध करून आखातातील आपल्या नेत्यांच्या हत्येचा सूड घेतल्याचा दावा आयएसच्या दहशतवाद्यांनी केला. दरम्यान, संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनिओ गुतेरस नायजेरियाच्या दौऱ्यावर असताना हे हत्याकांड घडविण्यात आले होते.

गेल्या आठवड्यात नायजेरियाच्या बोर्नो प्रांतात हा प्रकार घडला. बोर्नो प्रांतात आधीच बोको हराम आणि कट्टरपंथिय गटांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे आयएसच्या दहशतवाद्यांनी केलेल्या या हत्याकांडामुळे या भागात दहशत निर्माण झाली आहे. यावर्षी आखातात अमेरिका व मित्रदेशांच्या हल्ल्यांमध्ये आयएसचे बडे नेते मारले गेले. त्याचा सूड घेण्यासाठी आयएसचे दहशतवादी आफ्रिकेत अल्पसंख्यांकांचे हत्याकांड घडवित असल्याचे स्थानिक माध्यमे लक्षात आणून देत आहेत.

गेल्या आठवड्यातच संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव गुतेरस यांनी बोर्नो प्रांताचा दौरा केला होता. गुतेरस यांनी यावेळी दहशतवाद सोडून नायजेरियन समाजात परतलेल्यांची भेट घेतली. तसेच गेल्या कित्येक दशकांच्या संघर्षामुळे विस्थापित झालेल्या नायजेरियन नागरिकांच्या वस्त्यांची पाहणी केली. गुतेरस बोर्नोमध्ये असतानाच आयएसच्या दहशतवाद्यांनी हे हत्याकांड घडविल्याचा दावा केला जातो.

बोर्नो प्रांतातील आयएसचा वाढता प्रभाव चिंताजनक असल्याचा दावा केला जातो. याआधीच नायजेरियन लष्कर बोको हराम आणि इतर कट्टरपंथियांविरोधी कारवाईत गुंतलेले आहेत. आयएसच्या या हल्ल्यांमुळे नायजेरियन लष्करावरील ताण वाढणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येते.

दरम्यान, मोझाम्बिक, इथिओपिया, नायजर, घाना या देशांमध्ये आयएसच्या हल्ल्यांच्या घटना समोर आल्या होत्या. त्यात आता नायजेरियाची भर पडली असून आफ्रिका हा अत्यंत उग्र दहशतवादी संघटनांचे तळ बनत चालल्याची चिंता व्यक्त केली जाते.

leave a reply