अमेरिकेतील कोरोनाच्या बळींची संख्या दहा लाखांवर पोहोचली

वॉशिंग्टन/प्योनग्यँग – अमेरिकेत कोरोनाच्या साथीत दगावणाऱ्यांची संख्या 10 लाखांवर पोहोचली आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे व देशाचे हे नुकसान कधीही भरून निघणारे नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिली. कोरोनामुळे बळी पडलेल्यांमध्ये 65 वर्षे व त्यावरील नागरिकांचे प्रमाण 70 टक्क्यांहून अधिक असून जवळपास अडीच लाख मुलांनी आपले पालक गमाविल्याची माहिती अमेरिकी यंत्रणांनी दिली. दरम्यान, आतापर्यंत एकही रुग्ण न आढळल्याचे दावे करणाऱ्या उत्तर कोरियाने राजधानी प्योनग्यँगमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याची कबुली दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) प्रमुख अधिकाऱ्यांसह अमेरिकी उद्योजक बिल गेट्स यांनी कोरोनाची साथ अद्याप संपली नसल्याचे बजावले होते. अमेरिकेतील आकडेवारी त्याला दुजोरा देणारी ठरते. अमेरिकेत गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासून दरदिवशी एक लाखांच्या आसपास रुग्ण आढळत आहेत. गेल्या आठवड्यात बळींची सरासरी 350च्या वर गेली आहे. ही बाब कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्यास सुरुवात झाल्याचे संकेत देणारी ठरते, याकडे अमेरिकी आरोग्य तज्ज्ञ व अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले आहे.

अमेरिकेत दर 330 नागरिकांपैकी एक जण कोरोनाचा बळी ठरला आहे. अमेरिकेत दरवर्षी मृत्यू पावणाऱ्या नागरिकांमध्ये कर्करोग व हृदयविकारानंतर कोरोना हा तिसरा सर्वात मोठा घटक ठरला आहे. अमेरिकेत जानेवारी 2020मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर फेब्रुवारीत पहिल्या कोरोना बळीची नोंद झाली होती. 2021 सालच्या सुरुवातीला अमेरिकेत कोरोनामुळे बळी पडणाऱ्या रुग्णांचा उच्चांक नोंदविण्यात आला होता. या काळात अमेरिकेत दर दिवशी चार हजारांहून अधिक जणांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले होते. अमेरिकेतील सर्वाधिक बळी कॅलिफोर्निया राज्यात नोंदविण्यात आले आहेत. या राज्यातील बळींची संख्या 90 हजारांवर गेली आहे.

गेल्या अडीच वर्षात जगातील बहुसंख्य देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत असताना उत्तर कोरियाने आपल्याकडे साथ आली नसल्याचे दावे केले होते. मात्र आता देशात कोरोनाचा उद्रेक झाल्याची कबुली उत्तर कोरियाच्या राजवटीकडून देण्यात आली आहे. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग-उन यांनी राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली आहे. राजधानी प्योनग्यँगमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

उत्तर कोरियाने यापूर्वी कोरोनासंदर्भातील औषधे तसेच लसी स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यामुळे देशातील कोरोनाचा उद्रेक भयावह रुप घेऊ शकतो, असा दावा विश्लेषक करीत आहेत. दरम्यान, चीनच्या ‘झीरो कोविड पॉलिसी’वर नाराजी व्यक्त करणारे ‘डब्ल्यूएचओ’चे प्रमुख टेड्रॉस घेब्रेस्यूस यांना चीनने फटकारले आहे. घेब्रेस्यूस यांनी चीनचे धोरण दीर्घकाळ चालणारे नसल्याची टीका केली होती. त्यावर, घेब्रेस्यूस यांनी बेजबाबदार विधाने करु नयेत, अशा शब्दात चीनच्या प्रवक्त्यांनी नाराजी दर्शविली आहे.

leave a reply