लडाखच्या एलएसीवर क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या रफायलची उड्डाणे

नवी दिल्ली – लडाखच्या हवाई क्षेत्रात क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या रफायल विमानांनी उड्डाण केले आहे. वायुसेनेने याचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले असून हा नेहमीच्या उड्डाणाचा भाग असल्याची माहिती दिली. मात्र लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी ९ एप्रिल रोजी भारत व चीनच्या लष्कराची चर्चा पार पडणार आहे. या चर्चेच्या आधी रफायलची ही उड्डाणे चीनला सज्जड इशारा देत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. अजूनही लडाखच्या एलएसीजवळील काही क्षेत्रातून चीन माघार?घ्यायला तयार नसल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे रफायलची उड्डाणे चीनला खरमरीत इशारा देणारी असल्याचे दावे केले जातात.

लडाखच्या एलएसीवरील तणाव मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना देखील वायुसेनेच्या इतर लढाऊ विमानांसह रफायलने देखील इथल्या हवाई क्षेत्रात उड्डाण केले होते. पण आता क्षेपणास्त्रांनी पूर्णपणे सज्ज असलेल्या रफायलचे उड्डाण भारतीय वायुसेनेची क्षमता प्रदर्शित करीत आहे. लडाखच्या हवाई क्षेत्रात भारतीय वायुसेना वर्चस्व गाजवित असल्याचे वायुसेनाप्रमुख आरकेएस भदौरिया यांनी म्हटले होते. तर या क्षेत्रातील भारताची हवाई क्षमता चीनपेक्षा खूपच अधिक असल्याचा निर्वाळा पाश्‍चिमात्य विश्‍लेषकांनी दिला होता. त्यातच रफायल लढाऊ विमानांच्या समावेशामुळे भारतीय वायुसेनेचे सामर्थ्य प्रचंड प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे.

फ्रेंच बनावटीची अत्याधुनिक रफायल लढाऊ विमाने गेम चेंजर ठरतील, असा विश्‍वास वायुसेनेने याआधी व्यक्त केला होता. चीन आपल्याकडे रफायलहून अधिक प्रगत लढाऊ विमाने असल्याचा दावा करीत आला आहे. पण प्रत्यक्षात चीनचे हे दावे पोकळ असून चीनच्या हवाई दलाकडे रफायल इतकी क्षमता असलेली लढाऊ विमाने नाहीत. रशियन बनावट व तंत्रज्ञान यांचा वापर करून चीनने प्रगत लढाऊ विमानांची निर्मिती केली खरी. पण त्यांची क्षमता अत्यंत मर्यादित असून ही क्षमता कधीही सिद्ध झालेली नाही, याकडे सामरिक विश्‍लेषक लक्ष वेधत आहेत.

याच कारणामुळे रफायल विमानांचा वापर करून भारतीय वायुसेना चीनवरील दडपण वाढवित आहे. लडाखच्या एलएसीवरील सैन्यमाघारीची प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही. चीनने लडाखच्या पँगॉंग सरोवर क्षेत्रातून माघार घेतलेली असली तरी अद्याप गोग्रा, हॉटस्प्रिंग आणि डेप्सांग इथे चीनचे जवान तैनात आहेत. त्यांच्या माघारीखेरीज लडाखच्या एलएसीवरील तणाव निवळल्याचा दावा करता येणार नाही, असे भारताच्या लष्करप्रमुखांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. या आघाडीवर अजूनही चीन भारतावर दडपण टाकता येईल, अशा आशेवर आहे. पण भारताने याबाबत चीनला खरमरीत इशारा देऊन संपूर्ण सैन्यमाघारीखेरीज लडाखमधील तणाव संपणार नाही, असे बजावले आहे.

९ एप्रिल रोजी होणार्‍या चर्चेतही भारताकडून याबाबत परखड भूमिका घेतली जाईल, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्याचवेळी चीनने एखादी आगळीक केलीच, तर त्याला उत्तर देण्यासाठी भारत पूर्णपणे सज्ज असल्याचा इशारा क्षेपणास्त्रसज्ज रफायल विमानांच्या उड्डाणातून दिला जात आहे.

leave a reply