युक्रेनच्या सीमेजवळील सैन्यतैनातीवरुन अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचा रशियन राष्ट्राध्यक्षांना इशारा

सैन्यतैनातीवरुनवॉशिंग्टन/ब्रुसेल्स/मॉस्को – ‘युक्रेनचे सार्वभौमत्व आणि क्षेत्रीय अखंडता यासाठी अमेरिका वचनबद्ध आहे. त्यामुळे क्रिमिआमध्येे तसेच युक्रेनच्या सीमेजवळ रशियाने केलेली लष्कराची जमवाजमव त्वरीत माघारी घ्यावी आणि या क्षेत्रातील तणाव कमी करण्यासाठी सहाय्य करावे’, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना दिला. तसेच अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी रशियन राष्ट्राध्यक्षांना युक्रेनसह इतर मुद्यांवर चर्चा करण्याचा प्रस्तावही दिला. दरम्यान, नाटोपासून असलेल्या धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर, रशियाने युक्रेनच्या सीमेजवळील आपली सैन्यतैनाती केल्याची घोषणा रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू यांनी केली.

युक्रेनच्या सीमेजवळील रशियाच्या लष्करी तैनातीमुळे या क्षेत्रात मोठा तणाव निर्माण झाला आहे. रशियाने किमान ८५ हजार जवान युक्रेनच्या सीमेजवळ तैनात केल्याचा दावा केला जातो. याशिवाय रशियाने क्षेपणास्त्रभेदी व हवाई सुरक्षा यंत्रणाही सज्ज ठेवल्या आहेत. रशियाचे रणगाडे आपल्या पूर्वेकडील प्रांतांच्या रस्त्यांवरुन फिरत असल्याचे फोटोग्राफ्स आणि व्हिडिओ युक्रेनच्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. यामध्ये तथ्य नसल्याचे सांगून रशियाने हे दावे फेटाळले आहेत. पण युक्रेनच्या लष्कराने डोन्बासमधील रशियासमर्थकांवर कारवाई केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा रशियाने याआधी दिला होता.

याशिवाय डोन्बासमधील परिस्थिती बिघडली तर त्यासाठी युक्रेनला पाठिशी घालणारे पाश्‍चिमात्य देश देखील जबाबदार असतील, असा इशारा रशियाने दिला होता. २०१४ साली क्रिमिआच्या विभाजनाबरोबर झालेल्या मिन्स्क संघर्षबंदी कराराचे युक्रेन व पाश्‍चिमात्य देशांनी पालन करावे, असे आवाहन रशियाने केले होते. तसेच ब्लॅक सीमध्ये दाखल होणार्‍या अमेरिकेच्या विनाशिकांनी क्रिमिआपासून दूर राहणे, हे अमेरिकेच्याच भल्याचे असेल, असे रशियाने बजावले होते.

यावर अमेरिकेची प्रतिक्रिया आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी मंगळवारी रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती व्हाईट हाऊसने दिली. युक्रेनच्या मुद्यावर बोलताना राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी या देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडता याविषयी अमेरिका वचनबद्ध असल्याचा इशारा दिला. त्याचबरोबर २०१४ साली रशियाने ताब्यात घेतलेल्या क्रिमिआमधील व युक्रेनच्या सीमेजवळ केलेली सैन्यतैनाती मागे घ्यावी, अशीऽागणी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी केल्याचे व्हाईट हाऊसने म्हटले आहे.

अमेरिकेच्या सायबर क्षेत्रातील घुसखोरी आणि अमेरिकन निवडणुकांमधील रशियाच्या हस्तक्षेपावरुनही बायडेन यांनी पुतिन यांना बजावल्याचा दावा व्हाईट हाऊसने केला आहे. अमेरिका आपल्या हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी रशियाच्या कारवायांना योग्य उत्तर देईल, अशी धमकी बायडेन यांनी दिली. या चर्चेत अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी रशियन राष्ट्राध्यक्षांसह त्रयस्थ देशात बैठक आयोजित करण्याचा प्रस्तावही दिल्याचे व्हाईट हाऊसने स्पष्ट केले. यावर रशियाकडून उत्तर आलेले नाही.

दरम्यान, राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यापासून रशियाच्या विरोधात आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी गेल्याच आठवड्यात युक्रेनप्रश्‍नी रशियाला इशारा दिला होता. तर युरोपिय देशांच्या दौर्‍यावर असलेले अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन रशियापासून असलेला धोका अधोरेखित करून जर्मनीमध्ये अतिरिक्त सैन्यतैनाती करण्याची घोषणा केली आहे.

leave a reply