‘जी७’साठी पंतप्रधान मोदी जपानच्या हिरोशिमामध्ये दाखल

हिरोशिमा – पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानच्या हिरोशिमामध्ये दाखल झाले आहेत. इथे होणाऱ्या जी७च्या बैठकीत पंतप्रधान सहभागी होतील. त्यानंतर पंतप्रधान पापुआ न्यू गिनिआ आणि ऑस्ट्रेलियाला भेट देणार आहेत. जी७च्या या बैठकीत रशिया-युक्रेन युद्धाबरोबरच चीनच्या वर्चस्ववादी कारवायांविरोधात गंभीर चर्चा अपेक्षित आहे. त्यामुळे भारताच्या पंतप्रधानांची या बैठकीतील उपस्थिती लक्षवेधी ठरते. जपानसाठी निघण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी निक्केई एशिया या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत चीनबरोबरील सीमावाद, पाकिस्तानबरोबरील संबंधांबाबतची भारताची भूमिका मांडली. तसेच जागतिक पातळीवर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झालेली असतानाही भारत करीत असलेल्या आर्थिक कामगिरीकडे पंतप्रधानांनी या मुलाखतीत लक्ष वेधले.

‘जी७’साठी पंतप्रधान मोदी जपानच्या हिरोशिमामध्ये दाखल१९५७ साली भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हिरोशिमाला भेट दिली होती. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धातील अणुबॉम्बच्या हल्ल्यात बेचिराख झालेल्या हिरोशिमाला भेट देणारे मोदी हे भारताचे दुसरे पंतप्रधान ठरतात. त्यांचा हा दौरा ऐतिहासिक असल्याचे मानले जाते. रशिया व युक्रेनचे युद्ध भयंकर स्वरुप धारण करीत असताना, जी७च्या सदस्यदेशांनी रशियावर अधिक कडक निर्बंध लादण्याची तयारी केली आहे. याबरोबरच चीनच्या वर्चस्ववादी धोरणाविरोधात जी७कडून कठोर भूमिका स्वीकारली जाईल, असे संकेत दिले जातात. या पार्श्वभूमीवर, भारताची युक्रेनचे युद्ध व आणि चीनविषयक भूमिका अतिशय महत्त्वाची ठरते. निक्केई एशियाला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधानांनी देशाची भूमिका स्पष्ट शब्दात मांडली.

भारत आपले सार्वभौमत्त्व आणि सन्मानाचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे समर्थ आहे. भारताचे चीनबरोबरील सबंध परस्परांचा आदर, एकमेकांबद्दलची सहनशीलता व दोघांच्याही हितसंबंधांचे रक्षण यावर अवलंबून असतील. भारत व चीनचे संबंध सुरळीत असले, तर त्याचा हे क्षेत्र व त्याच्या बाहेरील क्षेत्रावरही सकारात्मक परिणाम होईल, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. चीन बलाढ्य देश असला तरी भारत आपली सुरक्षा व हितसंबधांचे रक्षण करण्यासाठी सज्ज असल्याचा संदेश जी७च्या या बैठकीआधी पंतप्रधानांनी दिल्याचे दिसत आहे.

याबरोबरच भारताला पाकिस्तानबरोबरही शेजारी देशाशी असायला हवे तसे सामान्य पातळीवरील संबंध अपेक्षित आहेत. मात्र दहशतमुक्त आणि वैरभाव नसलेले वातावरण निर्माण करण्याची व त्यासाठी योग्य ती पावले टाकण्याची जबाबदारी पाकिस्तानची आहे. तसे केल्याखेरीज दोन्ही देशांचे संबंध सामान्य पातळीवर येऊ शकत नाहीत, असे पंतप्रधान मोदी या मुलाखतीत पुढे म्हणाले.

युक्रेनच्या युद्धाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधानांनी भारताची यासंदर्भातील भूमिका अतिशय सुस्पष्ट असल्याची जाणीव करून दिल. या युद्धात भारत कुणा एका देशाच्या नाही, तर शांततेच्या बाजूने असल्याचे पंतप्रधान म्हणाले. तसेच युक्रेनच्या युद्धामुळे निर्माण झालेल्या अन्नधान्य, इंधन आणि खतांच्या टंचाईने जगासमोर फार मोठी आव्हाने खडी ठाकली आहेत, असे सांगून यावर पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली. याचा फटका बसत असलेल्या देशांना सहाय्य करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

जगभरात आव्हानात्मक परिस्थिती असताना देखील भारतीय अर्थव्यवस्था सर्वाधिक विकासदराने प्रगती करीत आहे. २०१४ साली भारत जगातील दहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होता. पण आता भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश बनला आहे. कारण या आर्थिक विकासासाठी आवश्यक असलेली पायाभरणी करण्यात आली व त्याचे परिणाम दिसू लागल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

हिंदी English

 

leave a reply