जागतिक विकासाचे इंजिन असलेल्या इंडो-पॅसिफिकची सुरक्षा जगासाठी महत्त्वाची

- क्वाडच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश

हिरोशिमा – इंडो-पॅसिफिक क्षेत्र जागतिक व्यापार, संशोधन आणि विकासाचे ‘इंजिन’ आहे. म्हणूनच या क्षेत्राची सुरक्षा आणि विकास जगासाठी अधिकच महत्त्वाचा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. जपानच्या हिरोशिमामध्ये पार पडलेल्या क्वाडच्या बैठकीत पंतप्रधानांनी इंडो-पॅसिफिकक क्षेत्राच्या सुरक्षेला दिलेले महत्त्व म्हणजे चीनच्या कारवायांपासून जगाला सावध राहण्याचा दिलेला इशाराच ठरतो. याच्या बरोबरीने भारत आपल्या सार्वभौमत्त्वाची सुरक्षा करण्यासाठी समर्थ असल्याची ग्वाही देखील पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिली.

जागतिक विकासाचे इंजिन असलेल्या इंडो-पॅसिफिकची सुरक्षा जगासाठी महत्त्वाची - क्वाडच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेशहिरोशिमामध्ये सुरू असलेल्या जी7च्या बैठकीदरम्यान भारत, अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया यांचा सहभाग असलेली क्वाडची बैठक पार पडली. पंतप्रधान मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन, जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा व ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यामध्ये पार पडलेल्या या चर्चेकडे चीन अत्यंत बारकाईने पाहत आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना देशांतर्गत परिस्थितीमुळे ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथे 24 मे रोजी होणाऱ्या क्वाडच्या बैठकीला उपस्थित राहणे शक्य नाही. यामुळे क्वाडची ही बैठक होऊ शकणार नाही, याकडे लक्ष वेधून चीनच्या सरकारी मुखपत्राने क्वाड अपयशी ठरल्याचा दावा केला. मात्र त्याच्या आधीच हिरोशिमामध्ये क्वाडची बैठक पार पडली, याकडे चीनच्या सरकारी मुखपत्राने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

इंडो-पॅसिफिक क्षेत्राला चीनपासून संभवणाऱ्या धोक्याचा थेट उल्लेख केलेला नसला तरी पंतप्रधान मोदी यांनी जगासाठी हे क्षेत्र अतिशय महत्त्वाचे आहे, याची जाणीव करून दिली. जागतिक व्यापार, संशोधन आणि विकासासाठी इंडो-पॅसिफिक क्षेत्र इंजिनाचे काम करीत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. या क्षेत्रात असलेला भारत आपल्या हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी पूर्णपणे समर्थ आहे. पण सागरी वाद व समस्या वाटाघाटींच्या मार्गाने सुटाव्या, अशी भारताची अपेक्षा असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

यासाठी इंडो-पॅसिफिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करण्यात यावे, अशी आग्रही भूमिका पंतप्रधान मोदी यांनी मांडली. तसेच इंडो-पॅसिफिक क्षेत्राचे स्थैर्य, सुरक्षा, शांतता आणि विकास या गोष्टी क्वाड प्रत्यक्षात उतरवित असल्याचे भारताच्या पंतप्रधानांनी स्पष्ट केले. इंडो-पॅसिफिक क्षेत्राला चीनच्या वर्चस्ववादी कारवायांचा धोका संभवतो. चीनच्या या कारवायांमुळे इंडो-पॅसिफिक क्षेत्रात अस्थैर्य व असमतोल निर्माण झालेला आहे. अशा परिस्थितीत, क्वाडच्या सदस्यदेशांकडून सातत्याने इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या स्थैर्य व सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून चीनला लक्ष्य केले जाते. त्यामुळे अस्वस्थ झालेला चीन क्वाडच्या प्रत्येक बैठकीकडे अत्यंत बारकाईने पाहत असल्याचे उघड झाले आहे. हिरोशिमा येथील क्वाडच्या बैठकीतून फारसे काही निष्पन्न होणार नाही, असे दावे चीनकडून करण्यात येत असले, तरी चीनने याची गंभीर दखल घेतल्याचा दावा आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था करीत आहेत.

दरम्यान, क्वाडच्या या बैठकीत मुंबईत झालेल्या 26/11च्या व पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्याचा कडक शब्दात निषेध नोंदविण्यात आला. तसेच सीमेपलिकडून निर्यात केल्या जाणाऱ्या दहशतवादाचीही या बैठकीनंतर प्रसिद्ध झालेल्या निवेदनात निर्भत्सना करण्यात आली आहे. त्यामुळे क्वाड चीनबरोबर दहशतवादाचा पुरस्कार करणाऱ्या पाकिस्तानलाही लक्ष्य करीत असल्याचे उघड झाले आहे.

leave a reply