पाकिस्तानातील विमान दुर्घटनेत १०० हून अधिक ठार

कराची – पाकिस्तानच्या कराची शहरात शुक्रवारी प्रवासी विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत शंभरहून अधिक जण ठार झाले आहेत. ‘पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स’चे (पीआयए) हे विमान रहिवाशी भागात कोसळल्यामुळे बळींची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळल्याचा दावा केला जातो. दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर दुःख व्यक्त केले आहे.

पाकिस्तानच्या लाहोर शहरातून निघालेले पिके३०३ प्रवासी विमान कराचीच्या ‘जिन्ना इंटरनॅशनल एअरपोर्ट’वर उतरण्याच्या तयारीत असताना ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेच्या आधी वैमानिकाने सदर विमान दोन ते तीन वेळा धावपट्टीवर उतरवण्याचा प्रयत्न केला. पण लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्यामुळे सदर विमान विमानतळाला लागून असलेल्या मॉडेल कॉलनी या रहिवासी भागावर कोसळले. या दुर्घटनेत सदर भागातील आठ ते दहा घरांचे नुकसान झाल्याचा दावा केला जातो.

विमान लाहोरला निघाले तेव्हा त्या विमानामध्ये ९८ प्रवासी आणि आठ विमान कर्मचाऱ्यांचा समावेश होता. विमान रहिवाशी भागात कोसळले तेव्हा या दहा घरांमध्ये किमान पंचवीस जण तरी असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे जीवितहानी फार मोठी असल्याचा दावा केला जातो. या घटनेनंतर पाकिस्तानी लष्कराने तातडीने मॉडेल कॉलनी भागाचा ताबा घेतला आणि वेगाने बचावकार्य सुरू केले आहे. शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत या भागातून पंचवीस ते तीस नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

या दुर्घटनेच्या काही मिनिटे आधी वैमानिक आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर यांच्यात झालेल्या संभाषणावरून तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना घडल्याचे उघड झाले आहे. तरीही पाकिस्तानी लष्कराने आणि सरकारने या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. गेल्या सहा वर्षात पाकिस्तानातील प्रवासी विमानांना झालेला हा तिसरा सर्वात मोठा अपघात ठरतो. याआधी २०१६ साली चित्राल येथून इस्लामाबाद येथे जाणारे विमान डोंगरात कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत ४७ जणांचा बळी गेला होता.

leave a reply