जगभरात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे सात हजारांहून अधिक बळी

वॉशिंग्टन – गेल्या चोवीस तासात कोरोनाव्हायरसमुळे जगभरात सात हजारांहून अधिक जणांचा बळी गेला. या साथीने अमेरिकेत एका दिवसात ३८५६ जण दगावले असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेपाठोपाठ ब्रिटनमध्ये या साथीचे एका दिवसातील सर्वाधिक बळी गेले आहेत. तर रशियामध्ये या साथीची लागण झालेल्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

कोरोनाव्हायरसमुळे जगभरात १,५६,२३४ जणांचा बळी घेतला असून या साथीचे अमेरिकेत सर्वाधिक बळी गेले आहेत. त्याचबरोबर अमेरिकेत या साथीची लागण झालेल्यांची संख्याही वाढली आहे. गेल्या चोवीस तासात अमेरिकेत २५ हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये या साथीने थैमान घातले असून इथे १४ हजार जण दगावले आहेत.

शुक्रवारी ब्रिटनमध्ये या साथीने ८८८ जणांचा बळी घेतला असून या देशात एकूण १५,६४६ जणांना आपले प्राण गमावले आहेत. शुक्रवारी ब्रिटनमध्ये २१ हजाराहून अधिक जणांची चाचणी झाली असून आत्तापर्यंत साडे तीन लाख जणांची कोरोनाची चाचणी झाल्याची माहिती ब्रिटनच्या सरकारने दिली.

गेल्या चोवीस तासात कोरोनाव्हायरसमुळे फ्रान्समध्ये ७६१, इटलीत ५७५ आणि स्पेनमध्ये ५६५ जण दगावले आहेत. फ्रान्समधील या साथीची लागण झालेल्यांची संख्या दीड लाखाजवळ पोहोचली आहे. इटलीमध्ये गेल्या चोवीस तासात या साथीचे ३४९३ रुग्ण आढळले आहेत. तर स्पेनमधील ४० टक्के रूग्णांना हॉस्पिटलमधून जाऊ दिल्याची घोषणा स्पेनच्या सरकारने केली.

दरम्यान, आफ्रिकेतील या साथीच्या बळींची संख्या हजारावर गेली आहे. आफ्रिकेतील अल्जेरीया, इजिप्त, मोरोक्को आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये कोरोनाव्हायरसचा फैलाव वाढला आहे.

leave a reply