जम्मू -काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान शहीद

श्रीनगर,  (वृत्तसंस्‍था) जम्मू- काश्मीरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या सोपेरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान शहीद झाले असून दोन जवान जखमी झाले आहेत.  त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. गेल्या आठवड्याभरातला हा जम्मू-काश्मीरमधला तिसरा हल्ला ठरतो.  

शनिवारी सोपेरमध्ये सीआरपीएफ १७९ बटालियनचे जवान आणि जम्मू- काश्मीर पोलिसांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान शहीद झाले. बिहारचे हेड कॉन्स्टेबल राजीव शर्मा, महाराष्ट्राचे कॉन्स्टेबल सीबी. भाकरे व गुजरातचे कॉन्स्टेबल परमार सत्यपाल सिंग अशी शहीदांची नावे आहेत. या हल्ल्यानंतर इथली सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली असून हल्लेखोरांचा कसून शोध घेतला आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही.                                     

दरम्यान, आठवड्याभरातला हा जम्मू-काश्मीरमधला  तिसरा दहशतवादी हल्ला ठरतो. शुक्रवारी जम्मू- काश्मीरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी हल्ला चढविला होता. यात एक जवान जखमी झाला होता. तर काही दिवसांपूर्वी जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवारमध्ये  दहशतवाद्यांनी विशेष पोलीस अधिक्षकांची हत्या केली होती.  लष्कर प्रमुख जनरल नरवणे  यांनी जम्मू-काश्मीरचा दौरा करून इथल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला होता. अजूनही जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद माजविण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न थांबलेले नाहीत. पाकिस्तान दहशतवादाची निर्यात करीतच आहे ,असा टोला लष्करप्रमुखांनी लगावला होता. 

कोरोनाव्हायरसचे संकट आलेले असताना भारत जगाला औषधांची निर्यात करीत आहे. तर पाकिस्तान दहशतवादाची निर्यात करीत आहे ,अशी जळजळीत टीका जनरल नरवणे यांनी केली होती.

leave a reply