मुंबई ते अलिबाग रो-रो सेवेला सुरुवात

मुंबई – गेल्या काही महिन्यापासून प्रतिक्षेत असलेली मुंबई ते अलिबागदरम्यानची रो-रो सेवा गुरुवारपासून सुरु झाली. १५ मार्च रोजी सुरु करण्यात आलेली ही सेवा लॉकडाऊनमळे दुसऱ्याच दिवसापासून बंद करण्यात आली होती. मात्र गणेशोत्सवानिमित्त अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धनला मोठया संख्येने नागरिक जात असल्याने त्यांच्या सुविधेसाठी उत्सवाच्या दोन दिवस आधी ही सेवा सुरु करण्यात आली आहे. मुंबईतील भाऊचा धक्का ते अलिबागजवळील मांडवापर्यंत ही रो-रो सेवा सुरु करण्यात आली आहे.

रो-रो

गुरुवारी सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी पहिली बोट मुंबईतील भाऊचा धक्का येथून रवाना झाली. तर संध्याकाळी ४ वाजता मांडव्यातून मुंबईसाठी बोट रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकाच वेळी हजार प्रवासी आणि २०० गाड्या वाहून नेण्याची बोटीची क्षमता आहे. या बोटीचे प्रवासी तिकीट ३०० रुपये असून दुचाकीसाठी हे दर २०० रुपये आहेत. चारचाकी वाहनांसाठी हे दर ८०० रुपये ते १२०० रुपये इतके आहेत.

प्रवाशांचा प्रतिसाद पाहुन या बोटीच्या वेळापत्रकात बदल केला जाणार आहे. या बोटीचे ऑनलाईन बुकिंगदेखील सुरु झाले आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईतील हजारो नागरिक रायगडला जातात. त्यामुळे महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गणेशोत्सवापूर्वी हि सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इतर काळातही नोकरीनिमित्त मुंबई ते अलिबागदरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याचवेळी पर्यटनासाठीही अलिबाग व नजिकच्या भागात जाणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली आहे. रस्ते प्रवासासाठी लागणार वेळ पाहता ही सेवा उपयुक्त ठरू शकते. आहे.

रो-रो

रो-रो सेवेमुळे प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेत बचत होणार असून मुंबईवरून मांडव्याला ४५ मिनिटात पोहोचणे शक्य होणार आहे. रो—रो बोटीतून स्वत:चे वाहन घेऊन जाणे शक्य असल्याने गावी जाणाऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. रो-रो सेवेसाठी भाऊचा धक्का आणि मांडवा येथे १२५ कोटी रुपये खर्चून सुसज्ज टर्मिनल आणि जेट्टी उभारण्यात आली आहे. ही सेवा जून २०१८ मध्ये सुरू होणे अपेक्षित होते. मात्र बोट उपलब्ध न झाल्याने सेवा रखडली होती. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात ‘प्रोटोपोरस’ बोट मुंबईत दाखल झाल्यानंतर ‘रो-रो’ सेवा सुरु करण्यात आली.

leave a reply