पाकिस्तानकडून भारताच्या विशिष्ट भागांना लक्ष्य करणारे अणुयुद्ध छेडण्याची धमकी

इस्लामाबाद – भारताने पाकिस्तानवर हल्ला चढविल्यास पाकिस्तान भारताच्या विशिष्ट भागांना लक्ष्य करणारे अणुयुद्ध छेडेल, अशी धमकी पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी दिली आहे. पाकिस्तानी मंत्र्यांच्या या धमकीची सोशल मीडियासह प्रसारमाध्यमांकडून खिल्ली उडविण्यात येत आहे. पाकिस्तान व सौदी अरेबियामध्ये निर्माण झालेल्या तणावापासून लक्ष वळविण्यासाठी रशीद यांनी हे विधान केले असावे, असा दावा काही विश्लेषक करीत आहेत. गेल्या वर्षीही शेख रशीद यांनी, पाकिस्तानकडे भारतावरील हल्ल्यासाठी १२५ ते २५० ग्रॅम्सचे अणुबॉम्ब असल्याचे हास्यास्पद वक्तव्य करून लक्ष वेधून घेतले होते.

अणुयुद्ध

‘भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर यापुढे पारंपारिक युद्ध होणार नाही. आता होणारे युद्ध अणुयुद्ध असेल आणि ते रक्तरंजित होईल. पाकिस्तानकडे छोटी व अचूक मारा करणारी अण्वस्त्रे आहेत. पाकिस्तानची अण्वस्त्रे भारतातील विशिष्ट भागांनाच लक्ष्य करतील. त्यामुळे भारतातील इस्लामधर्मीयांची जीवितहानी होणार नाही. पाकिस्तानकडे भारतातील आसाम राज्यापर्यंतच्या अंतरावर मारा करणारी अण्वस्त्रे आहेत’, अशा शब्दात रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी धमकावण्याचा प्रयत्न केला.

यावेळी पाकिस्तानी मंत्र्यांनी पारंपारिक युद्ध प्रकारात, भारताने हल्ला केल्यास पाकिस्तान कडे प्रत्त्युतरासाठी काहीच पर्याय नसल्याची कबुलीही दिली. हा पर्याय नसल्यानेच पाकिस्तान अणुयुद्ध छेडेल व त्यातून सगळ्यांची अखेर होईल हे भारताला माहीत असल्याचा दावाही शेख रशीद यांनी केला. भारताच्या वाढत्या संरक्षणसामर्थ्याची जाणीव असलेल्या पाकिस्तानला पारंपारिक युद्धात भारतापुढे निभाव लागणार नाही याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे भारताला विरोध दाखविण्यासाठी वारंवार अणुयुद्धाच्या युद्धाच्या पोकळ धमक्यांचा वापर करण्यात येत आहे.

अणुयुद्ध

गेल्यावर्षी भारताने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविण्याची घोषणा केल्यानंतरही, काश्‍मीर मुद्द्यावर लक्ष वेधण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी, आपल्या देशाकडे अण्वस्त्रे असल्याचे लक्षात ठेवावे अशी वल्गना केली होती. त्यानंतरही रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी, पाकिस्तानकडे १२५ ते २५० ग्रॅम्सचे छोटे अणुबॉम्ब असल्याचे म्हंटले होते. त्यांचे सध्याचे वक्तव्य पाकिस्तान सरकारला सर्वच आघाड्यांवर येत असलेले अपयश झाकण्यासाठी असू शकते, असा दावा विश्लेषकांकडून करण्यात येत आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी काश्मीर मुद्द्यावरून ‘ओआयसी’ या इस्लामी संघटनेला दिलेली धमकी चांगलीच अंगलट आली आहे. या धमकीनंतर सौदी अरेबियाने पाकिस्तानला करण्यात येणारा इंधन पुरवठा रोखला असून अब्जावधी डॉलर्सच्या कर्जाची परतफेड करावी अशी मागणी केली आहे. याप्रकरणी सौदीची मनधरणी करण्याचे पाकिस्तानचे सगळे प्रयत्न अपयशी ठरले असून सौदीला तातडीने एक अब्ज डॉलर्स द्यावे लागल्याचे वृत्त समोर आले आहे. पंतप्रधान इम्रान खान व इतर मंत्र्यांकडून या मुद्द्यावर सारवासारव करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.

leave a reply