तालिबानकडून परदेशी चलनाच्या वापरावर बंदी

परदेशी चलनाच्या वापरावर बंदीकाबुल – तालिबानने अफगाणिस्तानात परदेशी चलनाच्या वापरावर बंदी जाहीर केली आहे. तसेच आपल्या आदेशांचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी धमकी तालिबानने अफगाणी जनतेला दिली. तालिबानचा प्रवक्ता झबिउल्ला मुजाहिद याने मंगळवारी संध्याकाळी परदेशी चलनाच्या वापरावरील बंदीची ही घोषणा केली.

‘अफगाणी जनता, घाऊक विक्रेते, व्यापारी आणि व्यावसायिकांनी यापुढे सर्व व्यवहार फक्त अफगानी (अफगाणी चलन) मध्येच करावे. परदेशी चलनाचा वापर करण्याचे पूर्णपणे टाळावे. या आदेशांचे कुणीही उल्लंघन केल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. देशाची आर्थिक स्थिती आणि राष्ट्रीय हितासाठी अफगाणींनी आपल्या प्रत्येक व्यवहारांमध्ये अफगानीचाच वापर करावा’, असे मुजाहिद याने बजावले आहे.

गेल्या दोन दशकांमध्ये अफगाणिस्तानातील अमेरिकी डॉलर्सचा वापर वाढला आहे. अफगाणिस्तानच्या बाजारपेठेतील फेरीवाल्यांपासून दुकानांपर्यंत डॉलर्सचा सर्रास वापर केला जातो. तर सीमेवरील व्यापारात संबंधित देशातील चलनाद्वारे व्यवहार केले जातात. अफगानीचा वापर फारच कमी प्रमाणात होत असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे डॉलर्स तसेच परदेशी चलनाच्या वापरावर बंदी टाकण्याचा निर्णय तालिबानने घेतल्याचे दिसते.

पण तालिबानच्या या निर्णयाचा फटका अफगाणी जनता व देशाच्या अर्थव्यवस्थेला बसण्याची शक्यता वर्तविली जाते. १५ ऑगस्ट रोजी तालिबानने काबुलचा ताबा घेतल्यानंतर अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय समुदायाने अफगाणिस्तानला देण्यात येणारे आर्थिक सहाय्य रोखले आहे. अफगाणिस्तानच्या सार्वजनिक खर्चाचा तीन चतुर्थांश भाग या आंतरराष्ट्रीय मदतीवरच अवलंबून होता. हे सहाय्य रोखल्यामुळे अफगाणिस्तानातील सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन थकले असून तालिबानने मासिक वेतनाऐवजी गहू देण्याची तयारी केली आहे. तालिबानने अमेरिका व युरोपिय देशांकडे अफगाणिस्तानचे आर्थिक सहाय्य पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. तर अफगाणी जनतेला परदेशी चलनाच्या वापरावर बंदीथेट सहाय्य पुरविले जाईल, अशी भूमिका अमेरिका व मित्रदेशांनी स्वीकारली आहे.

अशा परिस्थितीत, तालिबानने परदेशी चलनाच्या वापरावर बंदी टाकल्यामुळे अफगाणींच्या समस्येत नवी भर पडेल, असा दावा पाश्‍चिमात्य विश्‍लेषक देत आहेत. कारण अफगानी चलनाला अफगाणिस्तानातच फार किंमत उरलेली नाही. शेजारच्या पाकिस्तानमधून डॉलर्स मिळवून ते अफगाणिस्तानात वेगवेगळ्या मार्गाने नेले जात आहेत. कारण अफगाणिस्तानात डॉलर्सची मागणी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. या अवैध व्यवहाराचा फार मोठा फटका पाकिस्तानला बसत असून त्याविरोधात पाकिस्तानमध्ये आरडाओरडा सुरू झाला आहे.

त्या पार्श्‍वभूमीवर, तालिबानने अफगाणी जनतेला दुसर्‍या देशाचे चलन न वापरण्याची सूचना केल्याचे दिसते. पण कितीही सक्ती केली तरी अफगाणिस्तानच्या व्यवहारातून डॉलर किंवा अन्य चलनाचा व्यापार पूर्णपणे रोखणे तालिबानला शक्य होणार नाही. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी करणारी यंत्रणाही तालिबानकडे नसल्याचे सध्या तरी दिसत आहे.

leave a reply