म्यानमारच्या लष्कराच्या कारवाईत १० निदर्शकांचा बळी

- ब्रिटनकडून सुरक्षा परिषदेच्या बैठकीची मागणी

यंगून – म्यानमारच्या लष्करी राजवटीने बुधवारी निदर्शकांवर केलेल्या गोळीबारात दहा निदर्शकांचा बळी गेला. म्यानमारचे लष्कर आणि पोलीस राजकीय नेते, शिक्षक, विद्यार्थी, प्रशासकीय अधिकार्‍यांची धरपकड करीत आहेत. तसेच काही ठिकाणी पोलिसांनी वैद्यकीय कर्मचार्‍यांना मारहाण केल्याचे व्हिडिओज् समोर येत आहेत. जगभरातून यावर प्रतिक्रिया येत असून म्यानमारच्या लष्करावर सडकून टीका केली जात आहे. म्यानमारमधील गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्याची मागणी ब्रिटनने केली आहे.

१ फेब्रुवारी रोजी म्यानमारच्या लष्कराने लोकशाहीवादी नेत्या अँग स्यॅन स्यू की यांच्यासह देशाचे पंतप्रधान व इतर बड्या नेत्यांना ताब्यात घेतले होते. दोन महिन्यांपूर्वी म्यानमारमध्ये झालेल्या निवडणुकति स्यू की यांच्या पक्षाने मोठा विजय मिळविला होता. पण या निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करून म्यानमारच्या लष्कराने सर्व सूत्रे हाती घेतली होती. आपल्या नेत्यांना झालेल्या अटकेनंतर म्यानमारच्या जनतेने रस्त्यावर उतरून त्यांच्या सुटकेसाठी निदर्शने सुरू केली आहेत. बुधवारच्या कारवाईनंतर गेल्या महिन्याभरापासून जुंटा राजवटीने निदर्शकांवर केलेल्या कारवाईत बळी गेलेल्यांची संख्या २८ वर पोहोचली आहे.

सोमवारी म्यानमारच्या लष्कराने स्यू की यांच्यावर दोन नवे आरोप ठेवले. यामध्ये देशाच्या संपर्कविषयक कायद्याचे उल्लंघन आणि देशात अराजक माजविण्याचा हेतू, या आरोपांचा समावेश आहे. याआधी म्यानमारच्या लष्कराने परदेशी वॉकीटॉकीचा वापर आणि कोरोनाव्हायरसच्या काळात प्रचार करीत असताना, नियमांचे उल्लंघन केल्याचे आरोप लादले होते. सदर आरोप कायद्याच्या कसोटीवर टिकणारे नाहीत, याची जाणीव झाल्यामुळे लष्कराने स्यू की यांची नजरकैद वाढविण्यासाठी आणखी दोन नवे आरोप ठेवले. पण यामुळे म्यानमारमधील परिस्थिती अधिकच चिघळली आहे.

म्यानमारच्या सर्व प्रमुख शहरांमध्ये जुंटा राजवटीविरोधात तीव्र निदर्शने सुरू आहेत. या निदर्शनांमध्ये शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा देखील समावेश असून बुधवारच्या गोळीबारात १९ वर्षांच्या विद्यार्थीनीचा बळी गेला. शिक्षक, विद्यार्थ्यांच्या बरोबरीने निदर्शनांमध्ये प्रशासकीय अधिकारी, पोलीस व लष्करातील जवानदेखील सहभागी होत असल्याचे समोर येत आहे. गेल्या आठवड्यात संयुक्त राष्ट्रसंघातील म्यानमारच्या राजदूतांनी जाहीररित्या आपल्या देशाला लष्कराच्या तावडीतून सोडविण्याची मागणी केली होती.

दरम्यान, म्यानमार आणि हाँगकाँगमधील लोकशाही समर्थक गटांनी एकत्र येऊन ‘मिल्क टी अलायन्स’ अशी नवी आघाडी उघडल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

leave a reply