इराकमधील अमेरिकेच्या तळावर रॉकेट हल्ले

- हल्ल्यामागे इराणसंलग्न गट असल्याचा संशय

बगदाद – इराकच्या ‘अइन अल-अस्साद’ हवाईतळावर बुधवारी भीषण रॉकेट हल्ले झाले. अमेरिकेच्या तळावर झालेल्या या हल्ल्यात एक कंत्राटदार ठार झाला. वर्षभरापूर्वी अमेरिकेने इराकमधील ड्रोन हल्ल्यात इराणचे वरिष्ठ लष्करी अधिकारी मेजर जनरल कासेम सुलेमानी यांना ठार केले होते. त्यानंतर इराणने याच हवाईतळावर रॉकेट हल्ले चढविले होते. दोन दिवसांपूर्वीच इराणने या हल्ल्यांचा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा याच हवाईतळावर झालेल्या हल्ल्यामागे इराण किंवा इराणसंलग्न दहशतवादी गट असल्याचा दाट संशय व्यक्त केला जातो.

बुधवारी सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी इराकच्या अन्बर प्रांतातील अल-अस्साद हवाईतळावर सलग दहा रॉकेट हल्ले झाले. राजधानी बगदादपासून जवळ असलेल्या या हवाईतळावर झालेल्या या हल्ल्यांमध्ये एका मोटारीचे नुकसान झाल्याचा दावा केला जातो. येथील अमेरिकी लष्कराच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे जवान सुरक्षित आहेत. पण लष्करी तळाजवळ असलेला कंत्राटदार या हल्ल्यात ठार झाला आहे.

दोन आठवड्यांपूर्वी इराकमधील इरबिल प्रांतात अमेरिकेच्या लष्करी तळावर झालेल्या रॉकेट हल्ल्यात देखील एक कंत्राटदारच ठार झाला होता. गेल्या महिन्यातील हल्ल्यासाठी इराकमधील इराणसंलग्न दहशतवादी संघटना जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला होता. बुधवारच्या रॉकेट हल्ल्यांमागे देखील इराकमध्ये प्रभाव ?असलेली ‘पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्सेस’ ही इराणसंलग्न दहशतवादी संघटना असल्याची शक्यता वर्तविण्यात येते.

इराकचे माजी पंतप्रधान नवाब नूरी मलिकी यांनी पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्सेसची (पीएमएफ) स्थापना केली आहे. तर गेल्या वर्षी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात कासेम सुलेमानी यांच्याबरोबर ठार झालेल्यांमध्ये अबू महदी अल-मुहानदिस हा देखील याच संघटनेच्या सशस्त्र गटाचा कमांडर होता. ‘पीएमएफ’ ही दहशतवादी संघटना असल्याचा आरोप अमेरिका करीत आहे. अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ल्यांबरोबर बगदादमधील अमेरिकेच्या दूतावासाबाहेर झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये देखील या संघटनेच्या कमांडर्सनी सहभाग घेतला होता.

सुलेमानी आणि मुहानदिस हे इराक तसेच सिरियात दहशतवादी नेटवर्क तयार करीत होते. तसेच हे दोघेही या क्षेत्रातील अमेरिकेच्या हितसंबंधासाठी धोकादायक असल्याचा आरोप करून गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात अमेरिकेने ड्रोनची कारवाई केली होती. सुलेमानी ठार झाल्यामुळे खवळलेल्या इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनी इराकमधील अमेरिकेच्या अल-अस्साद हवाईतळावर १५ हून अधिक कियाम, फतेह या क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविले होते. या हल्ल्यात किमान ११० अमेरिकन जवान जखमी झाले होते. त्यानंतरही इराण व इराणसंलग्न दहशतवाद्यांनी इराकमधील अमेरिकेचे जवान, दूतावास आणि लष्करी तळांना लक्ष्य करणारे हल्ले सुरू ठेवले आहेत.

leave a reply