नाव्हा-शेव्हामध्ये हजार कोटींचा अमली पदार्थांचा साठा पकडला

नवी मुंबई – महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई युनिटने नवी मुंबईच्या नाव्हा-शेव्हा बंदरात एका कंटनेरमधून १९१ किलो हेरॉइन जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात या हेरॉइनची किंमत हजार कोटी रुपये आहे. जप्त करण्यात आलेले हेरॉइन अफगाणिस्तानमार्गे भारतात आल्याची माहिती मिळत असून याचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय टोळीशी असल्याचे समोर येत आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

नाव्हा-शेव्हामध्ये हजार कोटींचा अमली पदार्थांचा साठा पकडला‘डीआरआय’ ला मिळालेल्या माहितीनंतर कारवाई करत हा अमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला. नाव्हा-शेव्हा बंदरात आलेल्या या कंटेनरमध्ये जेष्ठमध असल्याचे सांगण्यात आले होते. हेरॉईनचा हा साठा पाईपमध्ये विशिष्ठ पद्धतीने लपवण्यात आला होता. मागील काही काळात करण्यात आलेली अंमली पदार्थ जप्तीची ही मोठी कारवाई आहे. गेल्यावर्षी १९ जुलै रोजी नाव्हा शेव्हा मधूनच १३० किलो अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला होता.

अफगाणिस्थानमधील तस्कराच्या टोळीशी याचा संबंध असल्याची शक्यता ‘डीआरआय’ ने व्यक्त केली आहे. एका कंपनीच्या मार्फत मालाची आयात करण्यात आली. या कंपनीचा या तस्करीत सहभाग आहे का याचीही चौकशी करण्यात येईल. तसेच या मालाची आयात करण्यासाठी कागदोपत्री व्यवहार करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

याअमली पदार्थांच्या या तस्करीचा ‘टेरर फंडिंग’शी काही संबंध आहे का या दृष्टीने तपास करण्यात येत आहे. याआधी अमली पदार्थांच्या तस्करीतून मिळणार पैसा हा दहशतवाद्यांना आणि फुटीर गटांना सहाय्यासाठी वापरला जातो, हे आधी कित्येक वेळा उघड झाले आहे.

leave a reply