अराजक माजून पाकिस्तानचे तीन तुकडे पडतील

- माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा इशारा

इस्लामाबाद/अंकारा – पाकिस्तानचे तीन तुकडे पडतील. पाकिस्तानात गृहयुद्ध पेट घेईल. पाकिस्तानचे लष्कर उद्ध्वस्त होईल आणि पाकिस्तान आपली आण्विक क्षमता गमावून बसेल, असे इशारे या देशाचे माजी पंतप्रधान इम्रानखान देत आहेत. हे सारे टाळायचे असेल तर पाकिस्तानात लवकरात लवकर निवडणुकीची घोषणा करा, अशी मागणी इम्रानखान यांनी केली आहे. पंतप्रधानपदावर असताना आपल्या हाती संपूर्ण सत्ता नव्हती, लष्कराने आपले हात बांधलेले होते, असा गंभीर आरोप इम्रानखान यांनी केला आहे.

पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावर आल्यानंतर सरकार आणि लष्कर एकाच दिशेने पुढे जात असल्याचे दावे इम्रानखान यांनी ठोकले होते. तसेच पाकिस्तानचे लष्करच हा देश चालवते, हा भारताचा अपप्रचार असल्याचा दावा इम्रानखान यांनी केला होता. पण पाकिस्तानात खरी सत्ता लष्कराच्याच हाती आहे, हे इम्रानखान यांनी मान्य केले. इतकेच नाही तर आपल्या सरकारचे हात पाकिस्तानी लष्कराने बांधले व वेळोवेळी आम्हाला ब्लॅकमेल करण्यात आले, असा ठपका इम्रानखान यांनी ठेवला. पण आता पाकिस्तानी लष्कराच्या नेतृत्त्वाने हस्तक्षेप करून देशात निवडणुकीची घोषणा केली नाही, तर जनताच लष्कराला लक्ष्य करील, असा इशारा इम्रानखान यांनी दिला.

इतकेच नाही तर निवडणूक न झाल्यास पकिस्तानची तीन तुकडे पडतील आणि गृहयुद्ध पेटून अराजक माजेल, असा दावा इम्रानखान यांनी केला आहे. आपला देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. अण्वस्त्रे असलेला एकमेव इस्लामधर्मिय देश मोठ्या संकटात सापडला असून पाकिस्तान आपली आण्विक क्षमता यामुळे गमावू शकतो, असेही इम्रानखान यांनी पुढे बजावले आहे. दरम्यान, इम्रान खान यांचे राजकारण पाकिस्तानचे तीन तुकडे पाडण्यापर्यंत जाऊन ठेपले आहे, अशी जळजळीत टीका पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केली. सध्या तुर्कीच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इम्रानखान पाकिस्तानच्या शत्रूंची भाषा बोलत असल्याचा आरोप केला.

इम्रान खान यांची विधाने म्हणजे पाकिस्तानात अराजक माजवून फाळणी घडवून आणण्याचे कारस्थान असल्याचा ठपका पंतप्रधान शरीफ यांनी ठेवला. पाकिस्तानच्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या ‘पाकिस्तान पिपल्स पार्टी`चे नेते व असिफ अली झरदारी यांनी जवळपास याच शब्दात इम्रानखान यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे.

leave a reply