विस्तारवादी नाटोमुळे युरोपचे पुन्हा तुकडे होण्याची भीती – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा इशारा

मॉस्को – शीतयुद्धाच्या काळातील संघर्षाचे अवशेष असणार्‍या नाटोच्या विस्तारवादी धोरणांमुळे युरोपात अविश्‍वास व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे युरोपचे पुन्हा तुकडे होण्याची भीती आहे, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिला. रशिया हा युरोप खंडाचाच भाग आहे, यावर भर देऊन रशिया व युरोपिय महासंघाने परस्परांमधील संबंध दृढ करण्यासाठी अनेक पावले उचलल्याचा दावाही पुतिन यांनी केला. मात्र युक्रेनमध्ये २०१४ साली घडविण्यात आलेल्या सशस्त्र बंडानंतर परिस्थिती वेगाने बदलण्यास सुरुवात झाली असून युरोपच्या सुरक्षेला नव्या शस्त्रस्पर्धेचा धोका निर्माण झाल्याचे रशियन राष्ट्राध्यक्षांनी बजावले.

युरोपचे पुन्हा तुकडे२२ जून, १९४१ या दिवशी तत्कालिन जर्मनीतील नाझी हुकुमशहा ऍडॉल्फ हिटलरने रशियन संघराज्यावर (सोव्हिएत रशिया) हल्ला चढविला होता. या घटनेला ८० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी एका जर्मन साप्ताहिकात आपली भूमिका मांडणारा लेख लिहिला. या लेखात त्यांनी, दुसर्‍या महायुद्धात सोव्हिएत रशियाने जर्मनीच्या नाझी राजवटीचा पराभव केला होता व युरोपला गुलामगिरीतून वाचविले होते, याची आठवण करून दिली.

युरोपचे पुन्हा तुकडेत्यानंतर शीतयुद्धाच्या काळाकडे लक्ष वेधून, शीतयुद्धाची अखेर संपूर्ण युरोपसाठी समानपणे विजय ठरेल, असे वाटले होते, असे पुतिन यांनी लेखात नमूद केले. मात्र तसे न होता युरोपात तणाव वाढू लागला व त्यासाठी नाटो कारणीभूत आहे, असा ठपका रशियन राष्ट्राध्यक्षांनी ठेवला. ‘गेल्या २२ वर्षात सोव्हिएत रशियाचा भाग असलेल्या देशांसह १४ नवे देश नाटोत सामील झाले. या विस्तारवादामुळे युरोप खंड कोणत्याही मतभेदांशिवाय एकत्र राहिल, ही शक्यता धुळीस मिळाली’, अशी टीका राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी केली आहे. अनेक देशांना एकतर पाश्‍चात्यांबरोबर किंवा रशियाबरोबर जा, असे निर्णायक पर्याय देऊन नाटोत सहभागी होण्यास भाग पाडले गेले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

‘ग्रेटर युरोप’ची समृद्धी व सुरक्षा सर्व देशांच्या एकत्रित प्रयत्नांनीच शक्य असून त्यात रशियाचाही समावेश आहे, असे आवाहन पुतिन यांनी लेखात केले आहे. रशिया हा युरोपातील सर्वात मोठा देश आहे आणि सांस्कृतिक तसेच ऐतिहासिकदृष्ट्या युरोपशी जोडलेला आहे, याची जाणीवही रशियन राष्ट्राध्यक्षांनी यावेळी करून दिली. रशिया हा युरोपिय देशांबरोबर सर्वसमावेशक भागीदारीसाठी तयार असल्याचे आश्‍वासनही त्यांनी यावेळी दिले.

युरोपिय देशांनी नॅव्हॅल्नी प्रकरण व युक्रेनच्या मुद्यावर रशियाविरोधी भूमिका घेऊन निर्बंध लादले आहेत. त्याचवेळी रशियन अधिकार्‍यांवर हेरगिरीचा ठपका ठेऊन त्यांची हकालपट्टी करण्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे रशिया व युरोपमधील संबंध चांगलेच ताणले गेले असून ते तुटले तर त्यासाठ युरोप जबाबदार असेल, असा इशारा रशियाने यापूर्वी दिला होता. ही पार्श्‍वभूमी लक्षात घेता, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी जर्मन साप्ताहिकातून युरोपबरोबर सहकार्याची भूमिका मांडणारे मत व्यक्त करणे ही लक्षवेधी बाब ठरते.

leave a reply