नाटो ‘रॅपिड रिॲक्शन फोर्स’ची क्षमता तीन लाखांपर्यंत वाढविणार

-नाटोप्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांची घोषणा

NATOमाद्रिद – सध्याचा काळ सामरिक स्पर्धेचा असून या स्पर्धेला तोंड देण्यासाठी नाटो आपल्या ‘रॅपिड रिॲक्शन फोर्स’ची क्षमता तब्बल तीन लाखांपर्यंत वाढविणार असल्याची घोषणा नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी केली. शीतयुद्धाच्या कालावधीनंतर नाटोने आपल्या क्षमतेत केलेली ही सर्वात मोठी वाढ ठरली आहे. सध्या नाटोच्या ‘रॅपिड रिॲक्शन फोर्स’ची क्षमता 40 हजार जवानांची आहे.

मंगळवारपासून स्पेनची राजधानी माद्रिदमध्ये नाटोची बैठक सुरू होत आहे. रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यानंतर प्रथमच नाटोची व्यापक बैठक होत असून त्याला सदस्य देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत फिनलंड व स्वीडनला नाटोचे सदस्यत्व देणे आणि युक्रेनला करण्यात येणारे सहाय्य या मुद्यांवर प्राधान्याने चर्चा होणार आहे. त्याचवेळी रशियानजिक असलेल्या पूर्व युरोपिय देशांमधील लष्करी तैनाती तसेच चीनचे आव्हान यावरही चर्चा होईल, असे सांगण्यात येते.

NATO-forceबैठकीला सुरुवात होण्यापूर्वी नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी सोमवारी नाटोच्या वाढीव तैनातीची घोषणा केली. काही वर्षांपूर्वी रशियाच्या वाढत्या आक्रमक हालचालींच्या पार्श्वभूमीवर नाटोने ‘रॅपिड रिॲक्शन फोर्स’ची उभारणी केली होती. कोणत्याही हल्ल्याविरोधात तातडीने लष्करी तैनाती करता यावी यासाठी ‘रॅपिड रिॲक्शन फोर्स’ची निर्मिती करण्यात आली होती.

युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोपला असणारा धोका वाढल्याने यात मोठे बदल करण्यात येत असल्याचे स्टॉल्टनबर्ग यांच्याकडून सांगण्यात आले. त्यानुसार, पुढील काळात सदस्य देश आपला संरक्षणखर्च व सज्जता वाढविण्यावर भर देणार असून यासंदर्भातील योजनांना वेग देण्यात येईल, असे नाटोच्या प्रमुखांनी सांगितले. नाटो प्रमुखांच्या घोषणेनंतर ब्रिटनचे संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांनी ब्रिटनकडून संरक्षणखर्चात वाढीसाठी मोठी पावले उचलण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

leave a reply