अमेरिका-इराणची कतारमध्ये अणुकरारावर नव्याने चर्चा सुरू

biden-khameneiतेहरान/दोहा – व्हिएन्ना येथील वाटाघाटीत आलेले अपयश बाजूला सारुन अमेरिका व इराण अणुकरारासाठी नव्याने प्रयत्न करीत आहेत. मंगळवारपासून कतारची राजधानी दोहा येथे युरोपिय महासंघाच्या मध्यस्थीने अमेरिका-इराणमध्ये थेट नाही तर, अप्रत्यक्ष चर्चा सुरू होत आहे. 2015 सालचा अणुकरार वाचविण्यासाठी अमेरिका व इराणसमोर ही शेवटची संधी असल्याचे बोलले जाते. या वाटाघाटीसाठी पुढाकार घेणाऱ्या युरोपिय महासंघावर इस्रायलने टीकेची झोड उठविली आहे.

गेल्या वर्षी ज्यो बायडेन यांनी अमेरिकेची सूत्रे हातात घेतल्यानंतर इराणबरोबर अणुकराराबाबत वाटाघाटी सुरू केल्या होत्या. 2021 सालच्या एप्रिल महिन्यात व्हिएन्ना येथे सुरू झालेल्या या वाटाघाटी मार्च 2022पर्यंत चालू होत्या. या वाटाघाटींना यश मिळत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. बायडेन प्रशासनाने इराणच्या मागण्या मान्य केल्या असल्याचा दावा अमेरिकी अधिकाऱ्यांनी केला होता. तर अणुकरार शेवटच्या टप्प्यात असल्याचे संकेत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी दिले होते. पण याला इस्रायलने कडाडून विरोध केल्यानंतर अमेरिकेला या करारातून माघार घ्यावी लागल्याचा दावा माध्यमांनी केला होता. त्यामुळे व्हिएन्ना येथील वाटाघाटी अपयशी ठरल्याची कबुली युरोपिय महासंघातील काही अधिकाऱ्यांनी दिली होती.

IRAN-QATAR-DIPLOMACYअशा परिस्थितीत, गेल्या आठवड्यात युरोपिय महासंघाच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख जोसेफ बोरेल यांनी इराणचा दौरा केला. बोरेल यांनी इराणच्या नेतृत्वाची भेट घेतली. तसेच लवकरच अणुकराराबाबत नव्याने चर्चा सुरू होईल, अशी घोषणा केली होती. यानंतर अमेरिकी, युरोपिय व कतारमधील माध्यमांनी 2015 सालचा अणुकरार पुनर्जिवित करण्यासाठी नव्याने चर्चा सुरू होत असल्याची बातमी प्रसिद्ध केली. युरोपिय महासंघाच्या मध्यस्थीने या वाटघाटी सुरू होत असल्याचे कतारच्या माध्यमांचे म्हणणे आहे. अमेरिका व इराणने या वृत्ताला दुजोरा दिला. अणुकरारावरील वाटाघाटींसाठी इराणने नियुक्त केलेले प्रतिनिधी अली बाघेरी कानी मंगळवारी दोहासाठी रवाना झाले. तर अमेरिकेचे विशेषदूत रॉबर्ट मॅली हे देखील लवकरच कतारमध्ये दाखल होणार आहेत.

दरम्यान, इस्रायलचे परराष्ट्रमंत्री येर लॅपिड यांनी इराणला भेट देणाऱ्या जोसेफ बोरेल यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. इराणबरोबरच्या अणुकरारासाठी पुढाकार घेणाऱ्या बोरेल यांना इस्रायली नागरिकांच्या जीवाची अजिबात पर्वा नसल्याचा ठपका परराष्ट्रमंत्री लॅपिड यांनी ठेवला. नव्या चर्चेद्वारे पाश्चिमात्य देश इराणला अत्यंत चुकीचा संदेश देत असल्याची टीका लॅपिड यांनी केली. काहीही झाले तरी इराणला अणुबॉम्बने सज्ज होऊ देणार नसल्याची घोषणा इस्रायलने याआधी केली होती. तसेच इराणविरोधात लष्करी कारवाईचा पर्याय मोकळा असल्याचे इशारेही इस्रायलने वेळोवेळी दिले होते.

leave a reply