चीनच्या शिरजोरीविरोधात जागतिक आघाडी आवश्यक – ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान केविन रुड

लंडन/कॅनबेरा/बीजिंग – आर्थिक व भूराजकीय मुद्यांवर चीनकडून करण्यात येणार्‍या बळजबरीविरोधात जगभरातील देशांनी एकजूट होण्याची आवश्यकता आहे, असे ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान केविन रुड यांनी बजावले आहे. चीनविरोधात एकजूट झाली नाही तर चीन प्रत्येक देशाला वेगळे पाडून त्याची कोंडी करण्याचा धोका आहे, असा इशाराही रुड यांनी दिला. चीनसमर्थक नेते अशी ओळख असलेल्या रूड यांची ही विधाने लक्षणीय ठरत आहेत.

जागतिक आघाडीगेल्या काही वर्षात ऑस्ट्रेलिया व चीनमधील संबंध चिघळण्यास सुरुवात झाली आहे. यामागे हुवेईवरील बंदी, जागतिक आरोग्य संघटनेत चीनविरोधात घेतलेली भूमिका, साऊथ चायना सीबाबत स्वीकारलेले आक्रमक धोरण, हाँगकाँग व तैवानच्या मुद्यावर केलेली वक्तव्ये यासारख्या गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत. त्याचवेळी चीनच्या ऑस्ट्रेलियातील वाढत्या हस्तक्षेपाविरोधात हाती घेतलेली कारवाई हादेखील महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. ऑस्ट्रेलियाच्या या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी चीनने थेट व्यापारयुद्ध छेडले असून ऑस्ट्रेलियन उत्पादनांच्या आयातीवर बंदी तसेच कर लादले आहेत.

या पार्श्‍वभूमीवर माजी पंतप्रधान रुड यांनी चीनविरोधात जगातील विविध देशांनी एकजूट करण्याबाबत केलेले आवाहन महत्त्वाचे ठरते. रुड यांनी बीबीसी या ब्रिटीश वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, चीनच्या वाढत्या प्रभावाविरोधात जगात नवी भूराजकीय व्यवस्था आकारास येऊ शकते, असे संकेत दिले. ‘जर चीनची धोरणे व निर्णयाविरोधात नाराजी दर्शवायची असेल तर त्यासंदर्भातील भूमिका इतर समविचारी देशांबरोबर एकत्र येऊन घ्यायला हवी. जर एकट्या देशाने विरोध करायचे ठरविले तर द्विपक्षीय माध्यमातून चीनची राजवट सहजगत्या दडपण आणू शकेल, हे लक्षात घ्या’, असे माजी पंतप्रधान रुड यांनी बजावले.

‘चीनला एखाद्या गोष्टीवरून सुनावण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना ती गोष्ट आवडत नाही व त्यावरून वाद भडकू शकतो. मात्र एखादी गोष्ट चीनला आवडत नाही म्हणून इतर देशांनी ती करूच नये, असे मानण्याची गरज नाही’, असा सल्लाही रुड यांनी दिला. त्याचवेळी त्यांनी सध्याच्या ऑस्ट्रेलियन सरकारच्या चीनविरोधी धोरणावर नाराजीही व्यक्त केली. सध्याच्या सरकारचे धोरण म्हणजे कर्कश आवाजात सुरू असलेली बडबड असल्याची टीका त्यांनी केली.

माजी पंतप्रधान रुड यांच्या या वक्तव्यावर चीनच्या माध्यमांकडून प्रतिक्रिया उमटली आहे. चीन सरकारचे मुखपत्र असणार्‍या ‘ग्लोबल टाईम्स’ने चीनचे मित्र भासणारे केविन रुड विश्‍वासघात करत आहेत का, असा सवाल उपस्थित केला आहे. त्याचवेळी रुड यांनी आपली भाषा अशीच ठेवली तर चीनच्या बदलत्या दृष्टिकोनाची झळही त्यांनाही पोहोचल्याशिवाय राहणार नाही, असे बजावले आहे.

leave a reply