नेपाळच्या पंतप्रधानांच्या भारत दौर्‍यात महत्त्वाच्या करारावर स्वाक्षर्‍या

- भारत-नेपाळमध्ये पहिल्या ब्रॉडगेज प्रवासी रेल्वे सेवेची सुरुवात

नवी दिल्ली – भारत आणि नेपाळ दरम्यान धावणार्‍या पहिल्या ब्रॉडगेज प्रवासी रेल्वे सेवेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांच्या हस्ते झाला. तसेच भारतीय रुपे कार्डही नेपाळमध्ये सुरू करण्यात आले. याशिवाय ऊर्जा व रेल्वेशी संबंधीत चार सहकार्य करारांवर यावेळी स्वाक्षर्‍या झाल्या. यावेळी नेपाळने भारताबरोबर असलेल्या सीमावादाचे राजकीयीकरण टाळावे, अशी समज दिली. तसेच भारत-नेपाळमध्ये असलेल्या खुल्या सीमारेषेचा गैरफायदा कोणी घेणार नाही, याकडे नेपाळने लक्ष द्यावे, असेही पंतप्रधान मोदी यांनी नेपाळच्या पंतप्रधानांना स्पष्ट शब्दात सांगितले.

ब्रॉडगेजगेल्यावर्षी जुलै महिन्यात नेपाळच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर शेर बहादूर देउबा यांचा हा पहिला भारत दौरा आहे. पाचव्यांदा नेपाळचे पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या देउबा यांच्याआधी सत्तेवर असलेल्या कें.पी.ओली यांच्या कम्युनिस्ट सरकारची धोरणे ही संपूर्णत: चीनच्या बाजूने झुकलेली होती. ओली यांच्याच कार्यकाळात भारत व नेपाळमधील सीमावाद चिघळला. नेपाळने राजकीय नकाशा प्रसिद्ध करून भारताचे लिपुलेख, कालापानी व लिम्पीयाधुरा हे तीन भाग नेपाळमध्ये दाखविले होते. मात्र कम्युनिस्ट पक्षातील आपपसातील वादात व नेपाळी जनतेच्या असंतोषामुळे ओली सरकार कोसळले. त्यानंतर इतर पक्षांच्या पाठिब्यांवर देउबा यांच्या नेतृत्त्वाखाली सत्तेवर आलेल्या कॉंग्रेस सरकारची धोरणे भारताच्या बाजुने झुकलेली आहे.

नुकतेच चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी नेपाळ दौरा केला होता. यावेळी चीनचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणार्‍या बीआरआय संबंधित पायाभूत सुविधा प्रकल्पाबाबत करार करण्याचे नाकारून नेपाळने चीनला झटका दिला होता. भारताचा चीनच्या बीआरआय प्रकल्पाला विरोध आहे. या पार्श्‍वभूमीवर नेपाळच्या पंतप्रधानांच्या भारत दौर्‍याचे महत्त्व वाढते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान देउबा यांच्यामध्ये शनिवारी चर्चा पार पडली. यामध्ये दोन्ही देशांमधील सहकार्य मजबूत करण्याचा आणि द्विपक्षीय संबंध दृढ करण्याचा निर्णय झाला. यानंतर पंतप्रधान मोदी व पंतप्रधान देउबा यांच्या उपस्थितीत चार करारांवर स्वाक्षर्‍या झाल्या. यानुसार भारत व नेपाळमध्ये ऊर्जा सहकार्य वाढविण्यात येणार आहे. यातील एका कराराद्वारे नेपाळ हा इंटरनॅशनल सोलार अलायन्सची अधिकृतरित्या जोडला गेला आहे. तसेच भारत नेपाळला रेल्वेचे जाळे उभारण्यासाठी तांत्रिक सहाय्य करणार आहे. याशिवाय भारत नेपाळला पेट्रोलियम क्षेत्रात सहाय्य करणार असून यासाठी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आणि नेपाळ ऑईल कॉर्पोरेशनमध्ये करार झाला.

याआधी बिहारच्या जायनगरपासून नेपाळच्या कुरुथापर्यंत ३५ किलोमीटर लांबीची प्रवासी रेल्वे सेवा दोन्ही देशांच्या नेत्यांनी बटन दाबून सुरू केली. ही नेपाळमधील ही पहिली ब्रॉडगेज सेवा आहे. यामार्गावर ब्रिटीश काळापासून नॅरोगेज रेल्वेसेवा याआधी सुरू होती. मात्र २००१ च्या पुरात ती बंद पडली होती. त्यानंतर भारताने हा मार्ग नेपाळला आर्थिक व तांत्रिक सहाय्य करून पुन्हा उभारून दिला आहे. तसेच नेपाळमध्ये रुपे ही डिजिटल पेमेंट ऍपही सुरू करण्यात आले. याशिवाय सोली कॉरिडॉर येथील २३१ के.व्हीच्या ऊर्जा वितरण प्रणालीचेही उद्घाटन करण्यात आले. भारताने दिलेल्या कर्जसहाय्याने ही वीज वितरण लाईन उभी राहिली आहे.

leave a reply