सौदी-जॉर्डनमध्ये व्यापारी सहकार्य करार

व्यापारी सहकार्यअम्मान – अमेरिकेच्या दडपणाविरोधात आपली एकजूट आवश्यक असल्याची जाणीव झालेले आखाती देश सहकार्य वाढवित आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून या सहकार्याचा वेग वाढला आहे. सौदी अरेबिया आणि जॉर्डन यांच्यात नुकताच व्यापारी सहकार्य वाढविण्यासंबंधी करार पार पडला. गेल्या आठवड्याभरात सौदी व जॉर्डनमध्ये झालेला हा दुसरा सहकार्य करार ठरतो.

जॉर्डनच्या उद्योग आणि व्यापार मंत्रालयाने याची माहिती दिली. दोन दिवसांपूर्वी सौदीचे वाहतूक मंत्री ‘सालेह बिन नासिर बिन अल अल-जासेर’ यांनी जॉर्डनची राजधानी अम्मानचा दौरा केला होता. यावेळी पार पडलेल्या बैठकीत आर्थिक, व्यापारी, औद्योगिक, शैक्षणिक क्षेत्रांमधील गुंतवणूकीवर चर्चा पार पडली. तर दोन्ही देशांमध्ये व्यापार, आर्थिक बाजारपेठ, वाहतूक क्षेत्रातील सहकार्यासंबंधी करार झाले.

२०२१ सालापर्यंत सौदी व जॉर्डनचा वार्षिक व्यापार ४.२ अब्ज डॉलर्स इतका होता. यामध्ये सौदीकडून जॉर्डनला होणारी निर्यात मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर सौदीकडून जॉर्डनच्या पायाभूत सुविधा, वाहतूक, ऊर्जा क्षेत्रामध्ये केली जाणारी गुंतवणूक देखील फार मोठी असल्याचे जॉर्डनच्या सरकारचे म्हणणे आहे. पण आता सहा दिवसांपूर्वीच सौदीने जॉर्डनच्या सीमेपर्यंत नवी रेल्वेलाईन सुरू करण्याची घोषणा केली. यामुळे प्रवासी तसेच मालवाहतूकही सोपी होईल, असा दावा दोन्ही देशांकडून केला जातो.

दरम्यान, रशिया-युक्रेन संघर्ष आणि इराणबरोबर सुरू असलेल्या वाटाघाटींमुळे अमेरिकेने आखाती देशांचा विश्‍वास गमावल्याचा दावा केला जातो. त्यामुळे काही महिन्यांपूर्वीपर्यंत एकमेकांच्या विरोधात खडे ठाकलेले कतार व सौदी सारखे देश देखील तीव्र मतभेद बाजूला सारून एकमेकांना सहकार्य करू लागले आहेत. सौदी व जॉर्डनमधील सहकार्य देखील तसेच संकेत देत आहे.

leave a reply