इराण, येमेनमधील हौथी बंडखोरांच्या मुद्यावर अमेरिका-सौदीच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये चर्चा

अमेरिका-सौदीवॉशिंग्टन/रियाध – इराणने 2015 सालच्या अणुकराराचे उल्लंघन केल्याचा धक्कादायक अहवाल प्रसिद्ध होत असताना, अमेरिका आणि सौदीच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये चर्चा पार पडली. इराणचा अणुकार्यक्रम आणि इराणसंलग्न दहशतवादी संघटना यांच्यामुळे या क्षेत्राला निर्माण झालेला धोका यावर दोन्ही नेत्यांनी आपल्या देशाची भूमिका मांडली. तसेच युक्रेनच्या मुद्यावर सौदीने पाश्चिमात्य मित्रदेशांना साथ द्यावी, असे आवाहन अमेरिकेने केले. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह सौदीत दाखल होत आहेत. त्याआधी अमेरिका सौदीच्या मनधरणीचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन आणि सौदी अरेबियाचे पराष्ट्रमंत्री फैझल बिन फरहान अल सौद यांच्यात फोनवरुन चर्चा झाली. येमेनमधील संघर्षबंदीसाठी सौदीने दाखविलेल्या तयारीसाठी परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी सौदीचे आभार व्यक्त केले. त्याचबरोबर इराणच्या अणुकार्यक्रमाच्या मुद्यावरही चर्चा केली. आखाताच्या सुरक्षेसाठी अमेरिका आणि सौदीमध्ये व्यापक सहकार्याची आवश्यकता असल्याचे या चर्चेत मान्य करण्यात आले, अशी माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने दिली.

अमेरिका-सौदीयाशिवाय गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धावरही अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सौदीकडे सहकार्याची मागणी केली. युक्रेनचे सार्वभौमत्व आणि क्षेत्रीय एकात्मकता संरक्षित करण्यासाठी सौदीबरोबर आंतरराष्ट्रीय समुदायाचे समर्थन महत्त्वाचे ठरते, असे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी स्पष्ट केले. तर बायडेन प्रशासनाने इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सना दहशतवादी संघटनेच्या यादीत ठेवण्याबाबत घेतलेल्या निर्णयाचे सौदीने स्वागत केले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन जून महिन्याच्या अखेरीस आखाती देशांच्या दौऱ्यावर येणार आहेत. गेल्या वर्षी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हातीघेतल्यानंतर पहिल्यांदाच बायडेन आखाताचा दौरा करतील. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या या दौऱ्याची तारीख निश्चित झालेली नाही. पण राष्ट्राध्यक्ष बायडेन सौदीचा दौरा करून बिघडलेले संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करतील, असा दावा अमेरिकी माध्यमे करीत आहेत. यासाठी परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी सौदीच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा केल्याचे या माध्यमांचे म्हणणे आहे.

दरम्यान, रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह येत्या काही तासात सौदीला भेट देणार आहेत. रशियन परराष्ट्रमंत्री रियाध येथील ‘गल्फ कोऑपरेशन काऊन्सिल-जीसीसी’च्या बैठकीत सहभागी होतील. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर, जगभरात इंधनाचे दर कडाडत असताना ओपेक आणि रशियातील सहकार्य दृढ करण्यासाठी परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांचा हा दौरा असल्याचा दावा आखाती माध्यमे करीतआहेत. त्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सौदीची नाराजी दूर करून सौदीला आपल्या बाजूने वळविण्याचा आणखी एक प्रयत्न केल्याचे दिसत आहे.

leave a reply