या वर्षाच्या अखेरपर्यंत कच्च्या तेलाचे दर 100 डॉलर्सवर जातील

- अमेरिकी विश्‍लेषकाचा दावा

दुबई – 2014 सालानंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर तीन आकड्यांपर्यंत उंची गाठू शकतात. वर्षअखेरीपर्यंत हे दर प्रति बॅरल 100 डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याचा दावा जेपी मॉर्गन या प्रसिद्ध अमेरिकन वित्तसंस्थेचे विश्‍लेषक ख्रिस्तियन मॅलेक यांनी केला. पाच दिवसांपूर्वी अमेरिकेतील आणखी एका वित्तसंस्थेने असाच दावा केला होता. तर न्यूयॉर्क आणि इतर ट्रेडिंग हब्समध्ये सट्टेबाजांनी या किंमतीवर करारांची खरेदी सुरू केल्याचे समोर येत आहे.

या वर्षाच्या अखेरपर्यंत कच्च्या तेलाचे दर 100 डॉलर्सवर जातील - अमेरिकी विश्‍लेषकाचा दावाजून 2008 साली कच्च्या तेलाचे दर इतिहासातील सर्वोच्च पातळीवर अर्थात 172 डॉलर्स प्रति बॅरलवर गेले होते. त्यानंतर 2009 सालच्या जानेवारी ते ऑगस्ट महिन्यापर्यंत हेच दर 50 ते 87 डॉलर्सपर्यंत राखण्यात यश मिळाले होते. पण पुढच्या काही महिन्यांमध्ये कच्च्या तेलाच्या दराने पुन्हा शंभर डॉलर्सचा आकडा पार केला. एप्रिल 2010 ते ऑगस्ट 2014 सालापर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर शंभर डॉलर्सच्या वर होते.

पण त्यानंतर सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली इंधन उत्पादक देशांच्या ओपेक संघटनेने बाजारातील कच्च्या तेलाचा साठा वाढविल्यामुळे गेली सहा वर्षे हे दर खूपच कमी राहिले होते. अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर लादलेल्या निर्बंधानंतर, आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचा साठा कमी पडून दर प्रभावित होऊ नये, याची इतर इंधन उत्पादक देशांनी काळजी घेतली होती. तर गेल्या वर्षी अमेरिकेच्या उद्योगक्षेत्रावरील नियामक अडचणी, ओपेक सदस्य देशांचे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावरील नियंत्रण आणि कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर घटलेली मागणी यामुळेही कच्च्या तेलाचे दर नियंत्रित होते.

या वर्षाच्या अखेरपर्यंत कच्च्या तेलाचे दर 100 डॉलर्सवर जातील - अमेरिकी विश्‍लेषकाचा दावापण येत्या वर्षअखेरीपर्यंत कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 100 डॉलर्सवर जातील, असे मॅलेक यांनी म्हटले आहे. ‘वर्षाच्या दुसर्‍या सत्रात आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाची मागणी वाढली आणि कोरोनाची चौथी लाट टळली, तर 2021 सालच्या अखेरीपर्यंत कच्च्या तेलाचे दर 100 डॉलर्स प्रतिबॅरलवर पोहोचतील’, असा दावा मॅलेक यांनी आखाती वर्तमानपत्राकडे केला. यासाठी अमेरिका, चीन आणि युरोपिय देशांची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येणे व कच्च्या तेलाची मागणी प्रतिदिन 10 कोटी बॅरल्सपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे मॅलेक म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या दरवाढीवर चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी ‘बँक ऑफ अमेरिका’ने देखील कच्च्या तेलाचे दर तीन आकडी मजल मारतील, असे म्हटले होते. तर आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार देखील कच्च्या तेलाचे दर 100 डॉलर्सवर पोहोचणार असल्याचे संकेत देत आहेत. न्यूयॉर्क आणि इतर ट्रेडिंग हब्समध्ये या किंमतीवर सट्टेबाजारांनी करारांची खरेदी सुरू केल्याचे बोलले जाते.

दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर 70 डॉलर्स प्रति बॅरलवर आहेत. यात आणखी 30 डॉलर्सची भर पडून हे दर 100 डॉलर्सवर गेले, तर कोरोनाच्या प्रभावातून बाहेर पडण्यासाठी धडपडत असलेल्या देशांच्या अर्थव्यवस्थांना नवा धक्का बसू शकतो. इंधनाची आयात करणार्‍या देशांवर याचे विपरित परिणाम होऊ शकतात.

leave a reply