चीनकडून सेमीकंडक्टर क्षेत्रात वर्चस्व मिळविण्याची धडपड

- आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता

बीजिंग – गेल्या दशकभरात ‘५जी’पासून ते ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’पर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये चिनी कंपन्यांनी आघाडी घेतल्याचे समोर आले आहे. ही आघाडी अधिक भक्कम करण्यासाठी चीनने ‘सेमीकंडक्टर’ क्षेत्राकडे लक्ष वळविले असून चिनी कंपन्यांकडून सेमीकंडक्टर्सची निर्मिती सुरू झाल्याचे समोर येत आहे. ही बाब आंतरराष्ट्रीय समुदायाने गांभीर्याने घेतली असून या क्षेत्रात चीनचे वर्चस्व निर्माण झाल्यास ती अतिशय धोकादायक बाब ठरु शकते, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच विश्‍लेषक बजावित आहेत. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात इंटरनेट क्षेत्रातील आघाडीची चिनी कंपनी अलिबाबाने ‘यितिअन ७१०’ नावाची चिप सादर केली होती. ही चिप ‘क्लाऊड कॉम्प्युटिंग’साठी वापरण्यात येईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले. अलिबाबाव्यतिरिक्त तंत्रज्ञान क्षेत्रातील इतर आघाडीच्या कंपन्यांनाही चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने सेमीकंडक्टर क्षेत्रात गुंतवणूक करण्यास भाग पाडले आहे. यात टेन्सेंट, बायडू व शाओमी या कंपन्यांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षात या कंपन्यांनी सेमीकंडक्टर क्षेत्राच्या संशोधन व विकासासाठीची गुंतवणूक दुपटीने वाढविली आहे.

चीनकडून सेमीकंडक्टर क्षेत्रात वर्चस्व मिळविण्याची धडपड - आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंताचीनच्या कम्युनिस्ट राजवटीने सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी घेतलेल्या या पुढाकारामागे दोन घटक कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते. जागतिक स्तरावर महासत्ता बनण्याची महत्त्वाकांक्षा व गेल्या काही वर्षात पाश्‍चात्य देशांसह इतर देशांबरोबर सुरू झालेले व्यापारयुद्ध हे घटक चीनच्या धडपडीचे कारण ठरले आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रातील महासत्ता बनण्याच्या महत्त्वाकांक्षेतून चीनने गेल्याच दशकात महत्त्वाकांक्षी ‘मेड इन चायना पॉलिसी’ची घोषणा केली होती. या माध्यमातून माहिती तंत्रज्ञान, रोबोटिक्स यासारख्या क्षेत्रांमधील गुंतवणूक वाढविण्याचे संकेत दिले होते.

गुंतवणूक वाढवितानाच संवेदनशील तंत्रज्ञान असणार्‍या क्षेत्रातील परदेशी कंपन्यांचा मोठा हिस्सा मिळविणे अथवा त्या सरसकट ताब्यात घेण्याचे तंत्रही अवलंबण्यात आले होते. चीनकडून सेमीकंडक्टर क्षेत्रात वर्चस्व मिळविण्याची धडपड - आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतामात्र स्मार्टफोनपासून ते सॅटेलाईटपर्यंत प्रत्येक क्षेत्रासाठी महत्त्वाच्या ठरणार्‍या सेमीकंडक्टर क्षेत्रात या प्रयत्नांना फारसे यश मिळाले नाही. या क्षेत्रात आजही चिनी कंपन्या अमेरिका, युरोप व तैवान यासारख्या देशांवर अवलंबून आहेत. सेमीकंडक्टर क्षेत्रातील सध्याची आघाडीची कंपनी ‘टीएसएमसी’ तैवानची आहे. तर १० आघाडीच्या कंपन्यांमध्ये सहा अमेरिकन, दोन कोरियन व एका युरोपियन कंपनीचा समावेश आहे.

सध्या चीन व पाश्‍चात्य देशांमध्ये असलेला तणाव पाहता सेमीकंडक्टर क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांकडून चीनला सहाय्य मिळण्याची अजिबात शक्यता नाही. त्यामुळे आघाडीवर नसलेल्या पण सक्रिय असणार्‍या इतर कंपन्यांकडून सहाय्य घेऊन चीन पुढे जाण्याचा आटापिटा करीत आहे. अलिबाबा या कंपनीने सादर केलेल्या चिपसाठीही ब्रिटनमधील ‘एआरएम’ या कंपनीचे सहाय्य घेण्यात आले आहे. पण या कंपनीकडे असलेले तंत्रज्ञान व क्षमता सेमीकंडक्टर क्षेत्राचा विचार करता खूपच मर्यादित आहे. चीनकडून सेमीकंडक्टर क्षेत्रात वर्चस्व मिळविण्याची धडपड - आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतात्याचवेळी सेमीकंडक्टर तयार करण्यासाठी लागणार्‍या प्रक्रियेसाठी आवश्यक असणारी प्रगत यंत्रणा सध्या युरोपियन कंपनीकडून पुरविण्यात येते. ‘एएसएमएल’ नावाच्या या कंपनीने सध्या ही यंत्रणा चीनला देण्यास नकार दिला आहे.

मात्र असे असले तरी चीनकडून या क्षेत्रात सुरू असणारे प्रयत्न आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधून घेणारे ठरले आहेत. सेमीकंडक्टर्सच्या निर्मितीसाठी आवश्यक असणार्‍या ‘रेअर अर्थ मिनरल्स’ अर्थात दुर्मिळ खनिजांच्या क्षेत्रात सध्या चीनचे वर्चस्व आहे. त्याचा वापर चीन सेमीकंडक्टर्समध्ये आघाडी घेण्यासाठी करु शकतो, असे दावे केले जात आहेत. त्याचवेळी ५जी, आर्टिफिशल इंटेलिजन्स, क्वांटम कॉम्प्युटिंग, रोबोटिक्स, मशिन लर्निंग यासारख्या क्षेत्रात चीनने मिळविलेल्या आघाडीकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. गेल्या महिन्यात ब्रिटनच्या गुप्तचर प्रमुखांनी यासंदर्भात इशारा देताना, चीनकडून तंत्रज्ञान क्षेत्रात सुरू असलेल्या हालचाली पुढील दशकभरात जगातील भूराजकीय समीकरणे बदलणार्‍या ठरतील, असे बजावले होते. या पार्श्‍वभूमीवर चीनकडून सेमीकंडक्टर क्षेत्रात सुरू असलेली धडपड लक्षवेधी ठरते.

leave a reply