अमेरिका इराकमधून लवकरच माघार घेईल

- राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन – अमेरिकेचे लष्कर इराकमधून लवकरच माघार घेईल, असे आश्वासन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले. पण या माघारीचे निश्चित वेळापत्रक देण्याचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी टाळले. इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-कधेमी हे अमेरिकेच्या दौर्‍यावर असून त्यांच्याबरोबर झालेल्या भेटीत ट्रम्प यांनी ही घोषणा केली. इराकमध्ये अमेरिकेचे किमान ५००० जवान तैनात असल्याचे बोलले जाते.

इराकमधून लवकरच माघार घेईल

चार महिन्यांपूर्वी इराकच्या सत्तेवर आलेले पंतप्रधान मुस्तफा यांचा हा पहिला अमेरिका दौरा आहे. यावेळी पंतप्रधान मुस्तफा यांनी अमेरिकेकडून आत्तापर्यंत मिळालेल्या ‘आयएस’विरोधी संघर्षात मिळालेल्या सहकार्याबाबत आभार व्यक्त केले. यापुढेही अमेरिकेकडून इराकला असेच सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा इराकच्या पंतप्रधानांनी व्यक्त केली. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराकमधील अमेरिकेची माघार तसेच इराकच्या इंधन व ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूकीबाबत आश्वस्त केले.

‘अमेरिकेने आतापर्यंत इराकमधून बर्‍याच प्रमाणात लष्कर माघारी घेतले आहे. यापुढेही लवकरच अमेरिकेने इराकमधून पूर्ण माघार घेतलेली असेल’, असा दावा ट्रम्प यांनी केला. त्याचबरोबर अमेरिकेच्या माघारीनंतर इराक स्वत:च्या बचावासाठी सज्ज असेल, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला. यावेळी पत्रकारांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना इराकमधील माघारीच्या वेळापत्रकाबाबत विचारणा केली. या प्रश्नावर ट्रम्प यांनी उत्तर देण्याचे टाळले. तर याठिकाणी उपस्थित असलेले अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी लवकरच सैन्यसंख्येत कपात करण्यास सुरुवात होईल, अशी माहिती दिली.

सध्या दहशतवादविरोधी कारवाई आणि लष्करी प्रशिक्षणासाठी अमेरिकेचे पाच हजार जवान इराकमध्ये तैनात आहेत. पण या सैनिकांना लवकरात लवकर इराकमधून बाहेर काढावे, अशी मागणी इराकमध्ये जोर पकडत आहे. विशेषत: या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेने बगदादमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात इराणच्या कुद्स फोर्सेसचा प्रमुख जनरल कासेम सुलेमानी ठार झाल्यानंतर अमेरिकेच्या हकालपट्टीची मागणी वाढली. इराकच्या राजकारणातील इराणसमर्थक नेते व अधिकारी अमेरिकेच्या या सैन्यमाघारीचे जोरदार समर्थन करीत आहेत. त्याचबरोबर इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर तसेच लष्करी वाहनांना या इराणसंलग्न गटांकडून लक्ष्य केले जात आहे.

मे महिन्यात इराकच्या सत्तेवर आलेले मुस्तफा अल-कधेमी हे गुप्तचर यंत्रणेचे माजी प्रमुख होते. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मुस्तफा यांनी देशातील कट्टरपंथी गट व त्यांच्या नेत्यांवर कारवाई सुरू केली होती. यामध्ये इराणसंलग्न गटांच्या दहशतवाद्यांना इराकने ताब्यात घेतले होते. यानंतर इराणमधून पंतप्रधान मुस्तफा यांच्यावर टीकाही झाली होती.

leave a reply