इराकच्या इरबिल प्रांतातील इंधन प्रकल्पावर रॉकेट हल्ले

रॉकेट हल्लेबगदाद – इराकच्या इरबिल येथील इंधन शुद्धीकरण प्रकल्पावर सोमवारी रॉकेट हल्ले झाले. यामुळे सदर प्रकल्पात आग भडकली होती. या हल्ल्यांसाठी महिन्याभरापूर्वी इरबिलमध्येच क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविणाऱ्या इराणकडे संशय व्यक्त केला जातो. इरबिलमध्ये इस्रायली गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’चे एजंट्स असल्याचा आरोप इराणने याआधी केला होता. पण इराकमार्गे युरोपसाठी इंधन पाईपलाईन नेणाऱ्या इस्रायल आणि तुर्कीला इशारा देण्यासाठी इराणने क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविले होते, अशा बातम्याही समोर आल्या होत्या.

रॉकेट हल्लेरविवारी मध्यरात्री इराकच्या निन्वेह प्रांतातून कुर्दिस्तान प्रांताची राजधानी इरबिलवर सहा रॉकेट हल्ले झाले. येथील झाब नदीच्या काठाजवळ असलेल्या कावेरगोस्क या इंधन शुद्धीकरण प्रकल्पावर हे रॉकेट्स आदळले. या हल्ल्यामध्ये जीवितहानी झालेली नाही. पण सदर इंधन प्रकल्पामध्ये आग भडकून नुकसान झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली. हा प्रकल्प कुर्दवंशिय व्यावसायिक बाझ करिम बर्झांजी यांच्या मालकीचा आहे. बाझ यांच्या इंधन प्रकल्पावर झालेल्या या हल्ल्यासाठी इराणवर संशय व्यक्त केला जात आहे.

13 मार्च रोजी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सने इरबिलमध्ये 10 क्षेपणास्त्र हल्ले चढविले होते. इस्रायली गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’च्या छुप्या तळाला लक्ष्य केल्याचा दावा इराणने केला होता. तसेच यापुढेही इराक तसेच इतर अरब देशांमधील इस्रायल आणि मोसादच्या ठिकाणांना लक्ष्य करणार असल्याचा इशारा इराणने दिला होता. पण रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सनी मोसादच्या नाही तर बाझ करिम बर्झांजी यांच्या आलिशान बंगल्याला लक्ष्य केल्याचे उघड झाले होते.

रॉकेट हल्लेबर्झांजी हे इंधन क्षेत्राशी जोडलेले व्यावसायिक म्हणून ओळखले जातात. युक्रेनमध्ये भडकलेल्या युद्धामुळे युरोपिय देशांना सध्या इंधनाच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. युरोपिय देशांची इंधनाची ही मागणी पूर्ण करण्यासाठी इस्रायल व तुर्कीने इराकमार्गे पाईपलाईनने इंधनाचा पुरवठा सुरू करण्यासाठी हालचाली वाढविल्याच्या बातम्या आल्या होत्या. इस्रायल, तुर्की व बर्झांजी यांच्यात इरबिलमधील घरातच याबाबत चर्चा पार पडली होती. पुढे जाऊन इराणने सदर बैठकीचे ठिकाण असलेल्या बर्झांजी यांच्या याच घराला लक्ष्य केल्याचे दावे इराणी माध्यमांनी केले होते.

त्यामुळे इरबिलमध्ये झालेल्या रॉकेट हल्ल्यामागे इराण किंवा इराकमधील इराणसंलग्न दहशतवादी संघटना असल्याचा दाट संशय व्यक्त केला जातो. त्याचबरोबर इस्रायल आणि तुर्कीतील इंधन पाईपलाईनला हादरा देण्यासाठी इराण हे हल्ले चढवित असल्याची दाट शक्यता आहे.

leave a reply