उत्तर कोरियाकडून अमेरिकेला नव्या आण्विक चाचण्यांची धमकी

सेऊल – अमेरिकेच्या कारवाया ‘डेंजर लाईन’पर्यंत पोहोचल्या असून त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी नव्या आण्विक व आंतरखंडीय क्षेपणास्त्रांच्या चाचण्या करण्यात येतील, अशी धमकी उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जॉंग-उन यांनी दिली आहे. उत्तर कोरियाने या महिन्यात चार क्षेपणास्त्र चाचण्या केल्या असून त्यातील दोन चाचण्या हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या होत्या, असे सांगण्यात येते.

उत्तर कोरियाकडून अमेरिकेला नव्या आण्विक चाचण्यांची धमकीतीन वर्षांपूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जॉंग उन यांच्यादरम्यान झालेली बैठक अपयशी ठरली होती. त्यानंतर दोन देशांमधील चर्चा पूर्णपणे थांबली आहे. अमेरिकेकडून अनेकदा चर्चेची तयारी दर्शविण्यात आली असली तरी उत्तर कोरियाने त्यासाठी घातलेल्या अटी मान्य करण्याचे नाकारले आहे. अमेरिकेने अटी नाकारल्याने उत्तर कोरियाने पुन्हा एकदा आपल्या सामर्थ्यात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. किम जॉंग-उन यांची नवी धमकी त्याचाच भाग ठरतो.

यापूर्वी उत्तर कोरियाने २०१७ साली अणुचाचणी तसेच आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती. त्यानंतर कोरोनाची साथ व इतर कारणांमुळे उत्तर कोरियाने या चाचण्यांसंदर्भातील हालचाली थांबविल्या होत्या. मात्र मधल्या काळात उत्तर कोरियाने अणुचाचणी व आंतरखंडीय क्षेपणास्त्रांसह इतर क्षमताही विकसित केल्या आहेत. अमेरिकेने टाकलेल्या निर्बंधांना प्रत्युत्तर व बायडेन प्रशासनावर दडपण आणण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून उत्तर कोरिया या चाचण्यांचे सत्र सुरू करेल, असा दावा विश्‍लेषक करीत आहेत.

उत्तर कोरियाचा आण्विक व क्षेपणास्त्र कार्यक्रम हा वाढता धोका असल्याचा इशारा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता.

leave a reply