रशिया-युक्रेन तणावावर अमेरिकेचे भारताला ‘ब्रिफिंग’

नवी दिल्ली/वॉशिंग्टन – रशिया युक्रेनवर हल्ला चढविण्याच्या तयारी असल्याचा आरोप अमेरिका करीत आहे. अमेरिकेच्या उपपरराष्ट्रमंत्री वेंडी शर्मन यांनी यावरून रशियाला गंभीर परिणामांचा इशारा दिला. सोशल मीडियावरून रशियाला हा सज्जड इशारा देण्याच्या एक तास आधी, शर्मन यांनी आपली भारताच्या परराष्ट्र सचिवांशी फोनवरून चर्चा झाल्याची माहिती उघड केली. या चर्चेत रशियाबरोबरील निर्माण झालेल्या तणावाबाबतचे ‘ब्रिफिंग’ भारताच्या परराष्ट्र सचिवांना दिल्याचे अमेरिकेच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे.

रशिया-युक्रेन तणावावर अमेरिकेचे भारताला ‘ब्रिफिंग’‘रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना पुढे काय करायचे आहे, ते व्लादिमिर पुतिनच सांगू शकतात. पण ते राजनैतिक मार्गाचा वापर करतील अशी आशा आहे. तसे करणे रशियाची सुरक्षा, युरोपची सुरक्षा आणि रशियन जनतेच्या सुरक्षेसाठी भल्याचे ठरेल’, असे वेंडी शर्मन यांनी सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते. रशियाने युक्रेनवर हल्ला चढविल्यास त्याचे भयंकर परिणाम होतील, अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन, परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी दिली आहे. तर युक्रेन आणि आपल्या प्रभावक्षेत्रातील देशांना नाटोमध्ये सहभागी करून घेतले, तर ती युद्धाची घोषणाच ठरेल, असे रशियाने बजावले आहे. युक्रेनच्या सीमेवर रशियाचे एक लाख सैनिक आदेशाची प्रतिक्षा करीत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात कुठल्याही क्षणी युद्धाचा भडका उडेल, अशी स्फोटक परिस्थिती निर्माण झालेली आहे.

युक्रेनच्या प्रश्‍नावर रशिया व अमेरिकेमध्ये निर्माण झालेल्या या तणावाचे ‘ब्रिफिंग’ आपण श्रिंगला यांना दिल्याचे शर्मन यांनी सोशल मीडियावर जाहीर केले. याआधी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. या चर्चेही युक्रेनचा मुद्दा अग्रस्थानी होता, असे सांगितले जाते. आता शर्मन यांनीही श्रिंगला यांच्याबरोबरील चर्चेत युक्रेनच्या समस्येचा प्रमुख्याने उल्लेख केला आहे. यामुळे युक्रेनच्या मुद्यावर भारताने आपली बाजू घ्यावी, अशी मागणी अमेरिका करीत असल्याचे दावे केले जातात.

युक्रेनच्या मुद्यावर युद्धाचा भडका उडण्याची स्थिती असताना, भारताने मध्यस्थी करून ही समस्या सोडवावी, अशी अमेरिकेची अपेक्षा असल्याचे काही विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. मात्र युक्रेनच्या समस्येवर भारताने अमेरिका किंवा रशिया यापैकी कुणाचीही बाजू न घेता तटस्थ रहावे, असे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. भारताने तटस्थता सोडून कुणा एकाची बाजू घेतली, तर त्याचे परिणाम संभवतात, असा इशारा या विश्‍लेषकांनी दिला आहे.

रशियाकडून एस-४०० सुरक्षा यंत्रणेची खरेदी करून भारताने हा व्यवहार रद्द करण्याची अमेरिकेची मागणी धुडकावली होती. त्यानंतर अमेरिकेने भारतावर निर्बंध लादण्याची तयारी केली होती. पण त्याला अमेरिकेतूनच विरोध होत आहे. भारतीय वृत्तवाहिनीला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी, आपल्या देशासाठी भारताबरोबरील सहकार्य अनमोल असल्याचे म्हटले होते. अशा परिस्थितीत बायडेन प्रशासनयुक्रेनच्या मुद्यावर भारताने रशियाच्या विरोधात जाऊन अमेरिकेची बाजू घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करून भारतासमोरील अडचणी वाढविण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याबरोबरच युक्रेनच्या प्रश्‍नावर युरोपमध्ये युद्धाचा भडका उडू नये यासाठी जबाबदार मध्यस्थ देश म्हणूनही बायडेन यांचे प्रशासन भारताचा वापर करण्याची दुसरी शक्यताही समोर येत आहे. पण यासाठी भारत उत्सूक नसल्याचे दावे केले जातात. रशिया आणि अमेरिकेचेही सुरक्षाविषयक तसेच आर्थिक हितसंबंध भारताशी जोडलेले आहेत. याचा वापर करून भारत दोन्ही देशांमधला तणाव कमी करू शकतो, हा तर्क मध्यस्थीच्या या प्रस्तावामागे असण्याची दाट शक्यता आहे.

अमेरिका व रशियामधल्या या संघर्षाचा लाभ चीनसारखा मतलबी देश घेईल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्थान अधिकच भक्कम करण्यासाठी झपाट्याने पावले टाकू शकतो. त्यामुळे हा संघर्ष चीनच्या पथ्यावर पडणार असला तरी त्याचे भयंकर परिणाम अमेरिका-युरोपिय देशांसह सार्‍या जगाला भोगावे लागतील. यामुळे हा संघर्ष टाळण्यात भारताचेही हितसंबंध गुंतलेे आहेत. त्यामुळे भारत यासंदर्भात कोणती भूमिका स्वीकारतो, यावर सर्वांच्या नजरा खिळलेल्या आहेत.

leave a reply