दक्षिण कोरियाबरोबर युद्धसराव आयोजित करणार्‍या अमेरिकेला उत्तर कोरियाची धमकी

उत्तर कोरियाची धमकीसेऊल – ‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि त्यांच्या प्रशासनाला पुढील चार वर्षे शांतपणे झोप हवी असेल तर त्यांनी आपला निद्रानाश होईल, अशी कामे करू नये’, अशी धमकी उत्तर कोरियाने दिली. अमेरिका आणि दक्षिण कोरियामध्ये सुरू असलेल्या युद्धसरावाच्या पार्श्‍वभूमीवर, उत्तर कोरियाने धमकावले आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री आणि संरक्षणमंत्री दक्षिण कोरियाच्या दौर्‍यावर दाखल होण्याआधी उत्तर कोरियाने ही धमकी दिल्याचे दिसत आहे.

गेल्या आठवड्यापासून अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या लष्करामध्ये वार्षिक युद्धसराव सुरू झाला आहे. कोरोनाव्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेचे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा युद्धसराव गेल्या वर्षी पुढे ढकलला होता. पण गेल्या महिन्यातच बायडेन यांनी या युद्धसरावाच्या आयोजनाला परवानगी दिली. अमेरिका व दक्षिण कोरियन लष्कराच्या या युद्धसरावामुळे संतापलेल्या उत्तर कोरियाने बायडेन प्रशासनाला सज्जड इशारा दिला.

उत्तर कोरियाची धमकीउत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जॉंग-उन यांची बहिण ‘किम यो जॉंग’ यांनी ही धमकी दिली. अमेरिकेचे बायडेन प्रशासन कोरियन क्षेत्रात युद्ध भडकविण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप यो जॉंग यांनी केला. ‘जर खरच बायडेन प्रशासनाला पुढील चार वर्षे शांततेने झोपायचे असेल तर त्यांनी सुरुवातच निद्रानाशाने होईल, अशी कृत्ये करू नये’, असा इशारा यो जॉंग यांनी दिला.

त्याचबरोबर ‘दक्षिण कोरियाच्या प्रत्येक हालचालींवर आपली बारीक नजर आहे. दक्षिण कोरियाची एक चिथावणी, उत्तर कोरियाच्या कठोर कारवाईला आमंत्रित करील’, असे यो जॉंग यांनी धमकावले. अमेरिका आणि दक्षिण कोरियाला उत्तर कोरियाशी चर्चा करायचीच असेल तर लष्करी सरावासारख्या प्रक्षोभक कारवाया करू नये, असे यो जॉंग म्हणाल्या. उत्तर कोरियातील दुसर्‍या क्रमांकाचे प्रभावी नेतृत्व असलेल्या यो जॉंग यांनी दिलेल्या धमकीकडे गांभीर्याने पाहिले जाते.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन आणि संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन हे येत्या काही तासात दक्षिण कोरियात दाखल होतील. त्याआधी उत्तर कोरियाने अमेरिका व दक्षिण कोरियाला धमकावून जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.

leave a reply