महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट

- चोवीस तासात १७,८६४ नवे रुग्ण

दुसरी लाटनवी दिल्ली – महाराष्ट्रात कोरोनाची दुसर्‍या लाटेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर हालचाली कराव्या. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात कोरोनाच्या साथीचे संक्रमण वाढले असताना ज्या प्रमाणे उपाययोजना राबविण्यात आल्या होत्या, तशाच उपायोजना राबविण्याची आवश्यकता असल्याचे केंद्रीय आरोग्य सचिवांनी म्हटले आहे. तसेच महाराष्ट्र सरकारला ही साथ थोपविण्यासाठी पंधरा सूचनाही केल्या आहेत. सोमवारी महाराष्ट्रात १७ हजार ८६४ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ८७ जणांचा बळी गेला. मुंबईत १९२२ नवे रुग्ण आढळले आहेत.

देशात चोवीस तासात आढळत असलेल्या नव्या कोरोना बाधितांपैकी ६० टक्के रुग्ण महाराष्ट्रात होत आहेत. तसेच या साथीमुळे बळी जाणार्‍यांची संख्याही महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. गेल्या महिन्यात महाराष्ट्रात चोवीस तासात आढळत असलेल्या रुग्णांची संख्या तीन हजारांच्या खाली आली होती. मात्र आता पुन्हा ऑगस्ट-सप्टेंबरसारखी परिस्थिती दिसू लागली आहे. गेल्या आठवड्याभरापासून एका दिवसात १५ हजारांपेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे. तसेच कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात सुरू झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

महाराष्ट्रात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यावर ७ ते ११ मार्च दरम्यान केंद्रीय पथक राज्यात आले होते. या पथकाने मुंबईतील काही वॉर्डांसह ठाणे, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद जिल्ह्यांना भेट दिली होती. यावेळी पाहणीत केंद्रीय पथकाने नोेंदविलेली निरिक्षणे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठविलेल्या पत्रात नोंदविली आहेत. याच पत्रात महाराष्ट्रात दुसरी लाट सुरू झाल्याचा उल्लेख करीत राज्याला १५ सूचना दिल्या आहेत.

केवळ लॉकडाऊन करून चालणार नाही. त्यापेक्षा ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि आयसोलेशन या त्रिसूत्रीवर भर द्यावा. तसेच कंंटेनमेेंट झोन बनवावेत. यासाठी शीघ्र कृती पथके तयार करावीत. पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या किमान २० जणांचा शोध घ्यावा, अशा सूचना केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिल्या आहेत. तसेच राज्यात सध्या ऍक्टिव्ह केसेसपैकी ८० टक्के रुग्ण हे होम कॉरंटाईन आहेत. या धोरणाचा पुनर्आढावा घ्यावा. तसेच होम कॉरंटाईन करण्यात येणार्‍य व्यक्ती हायरिक्स गटात मोडणार्‍या नाहीत ना याची काटेकोर तपासणी व्हावी. असेही केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी म्हटले आहे.

तसेच डेथ ऑडिट पुन्हा सुरू करण्यात यावे. तसेच आरोग्य सुविधा पुरेशा असल्या तरी परिस्थिती चिघळल्यास काय होईल याची शक्यता लक्षात घेऊन तयारी सुरू करावी. चाचण्या वाढविण्यात याव्यात असेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्याला स्पष्ट केले आहे.

दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांची दिल्लीत भेट घेतली. राज्यातील कोरोनाच्या साथीबाबतच्या स्थितीचा यावेळी टोपे यांनी केंद्रीयमंत्र्यांना आढावा दिला. तसेच राज्यात आणखी लस उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. राज्यात आठवड्याला २० लाख लसींची आवश्यकता असल्याचे टोपे म्हणाले.

leave a reply